सरपंच निवडीवरून श्रेयवादाची लढाई
सरपंच निवडीवरून श्रेयवादाची लढाई
खोणीत शिंदे आणि ठाकरे गटात वाद; ज्योती जाधव यांची बिनविरोध निवड
डोंबिवली, ता. १ ः कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाच्या ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे; मात्र या निवडीमुळे खोणी गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, दोन्ही शिवसेनेकडून (शिंदे आणि ठाकरे) विजयाचे श्रेय घेण्यासाठी चुरस सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने हा पहिला विजय मिळविल्याचा दावा केला आहे.
ज्योती जाधव यांची निवड होताच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः दूरध्वनीवरून ज्योती जाधव यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच, शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली. शिंदे गटाचे महेश पाटील यांनी तत्काळ व्हिडिओ जारी करत ही निवड खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार झाल्याचा दावा केला. ६५ वर्षांच्या इतिहासामध्ये खोणी गावामध्ये दलित समाजातील सरपंच झाला नव्हता. म्हणून शिंदे यांच्या आदेशाने आमच्या सदस्यांनी मतदान करून दलित समाजाचा सरपंच निवडून दिला, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
माजी सरपंच हनुमान ठोंबरे म्हणाले, की खोणी गावातील सरपंचपदाची निवडणूक पार पडली. यात महेश पाटील यांनी शब्द दिला होता, की येथे जो कोणी सरपंच बसेल तो आपल्या माध्यमातून बसेल. येथे कोणत्याही गटाचा विषय नव्हता. हा शिंदेंचा बालेकिल्ला असून कायम राहील.
सरपंच जाधव यांचे स्पष्टीकरण
बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच ज्योती जाधव यांनी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. महेश पाटील यांनी शब्द दिला, त्यांनी तो पाळला असून आज मी येथे सरपंच झाले आहे. येथे कोणताही गट किंवा पक्षाचा विषय नाही, सर्व समाजाचा विषय आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले; मात्र सरपंचाच्या वक्तव्यानंतरही, उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा आणि शिंदे गटाच्या जोरदार दाव्यामुळे खोणी परिसरात राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या बिनविरोध निवडीनंतर ही दोन्ही गटांमध्ये ‘श्रेय’ घेण्याची चुरस सुरू झाली आहे.
मनसेची पडद्याआडची भूमिका
मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावल्याचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी ‘कोणाला काय राजकारण करायचे ते करू द्या, आमच्याकडून सरपंच जाधव यांना शुभेच्छा,’ असे म्हणत सहभाग अधोरेखित केला.

