संकट काळातील खलाशांचा रक्षक
संकटकाळातील रक्षक
करंजातील युवकामुळे १५ जणांना वाचवण्यात यश
उरण, ता. १ (वार्ताहर) ः मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या रायगडमधील दोन बोटींचा संपर्क तुटला होता. उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील अतिश कोळीसह त्याच्या साथीदाराने जीवाची बाजी लावून १५ खलाशांना करंजा येथे सुखरूप आणले. त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
करंजा येथील मच्छिंद्र नाखवा यांच्या मालकाच्या महागौरी नमो, ज्ञानेश्वरी बोटींचा संपर्क तुटला होता. त्या बोटिंची वायरलेस यंत्रणा जीपीएस यंत्रणा बंद होती. बोटींवरील १५ खलाशांबाबत कोणालाच काही माहिती नव्हते. बोट मालक मच्छिंद्र नाखवाने अनेक प्रयत्न केले. कोस्टगार्डकडे ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबईपासून आठ तास आतमध्ये बोटी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बोट मालक मच्छिंद्र नाखवाने करंजा येथील अतिश कोळी यांच्यासह खोल समुद्राकडे कूच केला. समुद्र खवळलेला असताना जीवाची बाजी लावत अतिश कोळी यांच्यासह भानुदास कोळी, बोट मॅनेजर आणि तांडेल २७ ऑक्टोबरला उरणच्या दिशेला निघाले. बोटीवरील जीपीएस बंद पडलेला असल्याने मोबाईलच्या साहाय्याने अतिश, त्याचे साथीदार जवळपास आठ तासांनी बोटी असलेल्या ठिकाणी पोहोचले. अखेर दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावर बोटी दिसून आल्या. या वेळी दोन्ही बोटी निकामी असल्याने भर समुद्रात नांगरून ठेवल्या होत्या.
---------------------------
- दोन्ही बोटींवरील राजू सिंग, मनोज सरण, पंकज यादव, राजू गौतम, जगदीश, संतोष कुमार यांच्यासह नऊ खलाशी चार दिवस बिस्किट, पाण्यावर होते. वादळामुळे घाबरलेल्या अवस्थेतील खलाशी आपला जीव मुठीत धरून होते. कोणीतरी जीव वाचविण्यासाठी येईल, या आशेत होते.
- अतिशसह त्याच्या साथीदारांनी बंद पडलेल्या दोन्ही बोटी दोरीच्या साहाय्याने बांधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. वादळामध्ये दोन्ही बोटी एकमेकांना बांधून आणणे खूप अवघड होते. अखेर २४ तास प्रवास करीत १५ खलाशांसह करंजा बंदरात दाखल झाले.
----------------------------
बोटीवरील खलाशी खूप घाबरले होते. चार दिवस वादळात असल्याने त्यांच्या पोटात अन्न नव्हते. बिस्कीट, पाणी पीत होते. २४ तास प्रवास करावा लागला. त्यातही खूप अडचणी आल्या; मात्र आम्ही करंजाला पोहोचल्यावर समाधान मिळाले.
- अतिश कोळी, मच्छीमार, करंजा
-------------------------------
बोटी बिघडल्याने चार दिवस वादळात बोटी नांगरून होतो. कधीही बोटी बुडण्याची भीती वाटत होती. कोणीतरी देवदूत येईल, असे वाटत होते. अतिशसह त्याचे सहकारी खरोखरच देवदूत म्हणून आले.
- संतोष कुमार, खलाशी

