भातखरेदीला होणार विलंब
भातखरेदीला होणार विलंब
पावसाचा अडथळा; केंद्रे नोव्हेंबरअखेरीस सुरू होण्याची शक्यता
अलिबाग, ता. १ (वार्ताहर) ः मेपासून सुरू झालेल्या पावसाने यंदा रायगड जिल्ह्यातील शेतीचे वेळापत्रकच विस्कळित केले आहे. ऑक्टोबरअखेरीसही पावसाचा मुक्काम कायम राहिल्याने शेतकऱ्यांचे भातपीक काढणीला विलंब होत आहे. परिणामी भातखरेदी केंद्रे उशिरा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एकूण २८ भातखरेदी केंद्रे असून, यावर्षी भाताला प्रतिक्विंटल दोन हजार ३६९ रुपयांचा दर घोषित करण्यात आला आहे. नोव्हेंबरअखेरीस ही केंद्रे सुरू होतील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी के. टी. ताटे यांनी दिली.
या वर्षी पावसाने मेच्या मध्यापासूनच हजेरी लावली. जूनमध्ये अल्प विश्रांती घेतल्यानंतर जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. काही भागांत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. पिके नुकतीच काढणीस तयार होत असतानाच ऑक्टोबर महिन्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे पीक ओलाव्यामुळे खराब झाले. सध्या शेतकरी उरलेले पीक वाचविण्याच्या प्रयत्नात असून, भात वाळविण्यासाठी उन्हाची प्रतीक्षा करीत आहेत. भातामध्ये अद्याप आर्द्रता असल्याने सुकवणी न झाल्यास भातखरेदी प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरू करता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खरेदी केंद्रांना उशिरा सुरुवात करावी लागणार आहे. सुरक्षित आणि दर्जेदार भात उपलब्ध झाल्यावरच टप्प्याटप्प्याने खरेदी केंद्रे सुरू करण्याचा फेडरेशनचा विचार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षीदेखील २८ केंद्रे कार्यरत राहणार असून, ती वाहतूक आणि साठवणुकीच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आपल्या भाताची विक्री शासकीय खरेदी केंद्रांवर करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसांत सुरू होईल, अशी माहिती के. टी. ताटे यांनी दिली. दरम्यान, पावसाचा अंमल कायम राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नुकसानीतून सावरत असतानाच भातखरेदी उशिरा होणार असल्याने आर्थिक फटका बसू शकतो, असे मत स्थानिक शेतकरी व्यक्त करीत आहेत. तरीही शासनाने वेळेत खरेदी सुरू करून मदतीच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.................
चौकट :
जिल्ह्यात २८ भातखरेदी केंद्रे कार्यान्वित होणार
भाताचा दर प्रतिक्विंटल २, ३६९ रुपये
ऑनलाइन नोंदणी लवकरच सुरू
नोव्हेंबरअखेरीस खरेदी केंद्रांना प्रारंभ

