अंतर्गत मेट्रोच्या भुयारी मार्गात अडथळा

अंतर्गत मेट्रोच्या भुयारी मार्गात अडथळा

Published on

अंतर्गत मेट्रोच्या भुयारी मार्गात अडथळा
१३२ इमारतींचे स्ट्रक्चरल नकाशे तपासणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ बहुचर्चित असलेल्या अंतर्गत मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होण्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र अंतर्गत मेट्रोच्या मार्गातील ठाणे स्थानक ते नवीन ठाणे रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या दीड किमीच्या परिघातील १३२ इमारती अडथळा ठरण्याची शक्यता आहे. या इमारतींच्या खालून भूमिगत मेट्रो मार्ग जाणार असल्यामुळे त्यांच्या पायाची खोली किती आहे, हे तपासण्यासाठी महामेट्रोने ठाणे महापालिकेकडे या इमारतींचे स्ट्रक्चरल नकाशे मागवले आहेत.
रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार असून, २०२९ पर्यंत ही मेट्रो प्रवासी सेवेत दाखल होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ठाणेअंतर्गत मेट्रो प्रकल्पाची लांबी २९ किलोमीटर असून, त्यापैकी २६ किलोमीटर उन्नत आणि तीन किलोमीटर भूमिगत मार्ग असेल. या मार्गावर २२ स्थानके असतील. त्यापैकी दोन स्थानके भूमिगत असतील. यातील एक स्थानक ठाणे रेल्वेस्थानकाशी थेट जोडले जाणार आहे. दररोज अंदाजे ७.६१ लाख प्रवासी या मेट्रोतून प्रवास करतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोर्रेशन लिमिटेड (महामेट्रो)मार्फत राबवला जाणार असून, १२ हजार २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प केंद्र सरकारने ऑगस्ट २०२४मध्ये मंजूर केला आहे.

प्रकल्पांतर्गत ठाणे स्थानकापासून ते नवीन रेल्वेस्थानक (मनोरुग्णालयजवळ) या भागातून भूमिगत मेट्रो धावणार आहे. दीड किमीचे हे अंतर असून, या मार्गात तब्बल १३२ जुन्या नवीन इमारती येत आहेत. या इमारतींना धक्का न लावता हा प्रकल्प मार्गी लावण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे या इमारतींचा पाया किती खोलवर गेला आहे याची माहिती मिळावी, यासाठी महामेट्रोकडून त्या इमारतींचे स्ट्रक्चरल नकाशे मागविण्यात आल्याची माहिती शहर विकास विभागाचे अधिकारी देवेंद्र नेर यांनी दिली. येत्या काही दिवसांत हे नकाशे पुरविले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अंतर्गत मेट्रोचे फायदे
१. सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी हाईल.
२. वाहतूक कोंडी कमी होईल, इंधन बचत होईल.
३. प्रदूषणात घट होऊन प्रवासाला गती येईल.

डोंगरीपाडापासून सुरुवात
प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला घोडबंदर भागातील डोंगरीपाडा येथून सुरुवात होणार आहे. डोंगरीपाडा ते बाळकुम या मार्गावर काम सुरू केले जाणार आहे.

प्रमुख स्थानके
रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्यनगर बस डेपो, शिवाजीनगर, नीलकंठ टर्मिनल, गांधीनगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, पातलीपाडा, आझादनगर, मनोरमानगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकूम नाका, बाळकूमपाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे अशी स्थानकांची आखणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com