डोंबिवली शहराने घेतला मोकळा श्वास

डोंबिवली शहराने घेतला मोकळा श्वास

Published on

डोंबिवली शहराने घेतला मोकळा श्वास
दिवाळीनंतर हटविल्या राजकीय कमानी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : गणेशोत्सव, दहीहंडीपासून सण-उत्सवांच्या निमित्ताने डोंबिवली शहरात लागलेल्या राजकीय कमानी दिवाळीचा सण सरताच हटण्यास सुरुवात झाली आहे. या ‘शुभेच्छा देण्याच्या’ नावाखाली उभारलेल्या भव्य कमानी आगामी स्थानिक निवडणुकांचा अनाहूत राजकीय प्रचार म्हणूनही पाहिल्या जात होत्या. डोंबिवली शहरात प्रत्येक सण राजकारणासाठी एक व्यासपीठ बनतो, हे यावर्षी पुन्हा एकदा दिसून आले. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीमध्ये विविध पक्षांनी सामाजिक शुभेच्छा देत नागरिकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

फडके रोड, स्थानक परिसर, विष्णुनगर, गोपाळनगर, मानपाडा रोड, टिळकनगर येथे मोठ्या प्रमाणात कमानी उभारल्या जातात. भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, मनसेसह सर्वच राजकीय पक्ष कमानी उभारण्यास पुढे असतात; मात्र यंदा यात भाजप आणि शिंदे गटाच्या कमानींची संख्या लक्षणीयरीत्या जास्त होती. ‘शुभेच्छांच्या’ आडून कार्यकर्त्यांनी स्थानिक वॉर्ड पातळीवर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे या कमानींची स्पर्धा ‘कोणाचा प्रभाव जास्त’ या चर्चेचा विषय बनली होती.

वाहतुकीला अडथळा
डोंबिवली शहरातील अरुंद रस्ते आणि ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे यामुळे वाहतुकीची समस्या आहे. अशा परिस्थितीत, या कमानीदेखील वाहतुकीला अडथळा ठरत आल्या आहेत. वारंवार ओरड होऊनही, दहीहंडीला लागलेल्या या कमानी दिवाळीनंतरच उतरतात, असे जणू आता समीकरणच होऊन बसले आहे. सध्याच्या घडीला शिवसेना शिंदे गटाच्या कमानी हटल्या असल्या तरी, भाजपच्या काही रस्त्यांवरील कमानी अद्यापही ‘जैसे थे’ आहेत.

पालिकेचे अतिक्रमण हटाव अभियान
सण-उत्सव संपल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील बॅनर, फलक हटविण्यास सुरुवात केली आहे. मंडळांचे तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी लावलेल्या कमानी हटविण्यास सांगण्यात आले असून, त्यानुसार कमानी हटण्यास सुरुवात झाली आहे. या कमानी हटवण्यास सुरुवात झाली असली तरी, राजकीय छाप मात्र नागरिकांच्या मनात राहिली आहे. कोणत्या नेत्याने कोणत्या भागात किती कमानी उभारल्या, त्यावरून स्थानिक नेत्यांची संघटनात्मक ताकद मोजली जात असल्याचे बोलले जात आहे. कमानी हटल्या असल्या तरी राजकीय शुभेच्छांचा आणि जनसंपर्काचा हंगाम अजून संपलेला नाही. स्थानिक पातळीवर उमेदवारांची तयारी आणि नवे चेहरे पुढे आणण्याचे प्रयत्न वेग घेत आहेत. त्यामुळे डोंबिवलीत दिवाळीनंतरही ‘राजकीय रोषणाई’ कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com