जिल्हा सुपरस्पेशालिटी रुग्णालय टप्प्यात

जिल्हा सुपरस्पेशालिटी रुग्णालय टप्प्यात

Published on

जिल्हा सुपरस्पेशालिटी रुग्णालय टप्प्यात
आचारसंहिता लागण्याआधी लोकार्पण
रुग्णांना मिळणार दर्जेदार उपचार
राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणेकरांसह जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा देणारे ठाणे जिल्हा सुपरस्पेशालिटी रुग्णालय आता पूर्णत्वाच्या मार्गावर आले आहे. रुग्णालयाची १० मजली भव्य इमारत पूर्ण झाली असून, आतील सर्व सुविधा अंतिम टप्प्यात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या रुग्णालयाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

९०० खाटांची क्षमता असलेले हे सुपरस्पेशालिटी रुग्णालय केवळ ठाणेच नव्हे, तर मुंबई, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठीही वरदान ठरणार आहे. मुंबईला जाऊन उपचार घेण्याची वेळ आता ठाणेकरांवर येणार नाही. कारण अत्याधुनिक सर्वच सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयाची पायाभरणी दानशूर विठ्ठल सायन्ना यांनी दिलेल्या जागेवर झाली होती. सुमारे ९० वर्षांपूर्वी उभारलेले जुने रुग्णालय पाडून त्याच ठिकाणी आधुनिक दहामजली इमारत उभारण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. आवश्यक साधनसामग्रीही दाखल करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने कामाला गती देण्यात आली आहे. याचा राजकीय लाभ सत्ताधाऱ्यांना होणार आहे. असे असले तरी या रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याला वैद्यकीय क्षेत्रात नवा आयाम मिळणार असून, ठाणेकरांसाठी ही सुविधा आरोग्य क्षेत्रातील मोठी झेप ठरणार आहे.

अत्याधुनिक इमारत
नव्या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ तब्बल ६.८१ लाख चौरस फूट असून, मुख्य इमारतीसोबत नर्स ट्रेनिंग सेंटर आणि वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १४ वॉर्ड, ११ आधुनिक आयसीयू, ११७ बेड आणि १५ ऑपरेशन थिएटरसह हे रुग्णालय अत्याधुनिक सोयींनी सज्ज आहे.

एकाच छताखाली सर्व सुविधा
सुपरस्पेशालिटी विभाग (२०० खाटा) : कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजीसारख्या उच्चस्तरीय उपचारांची सुविधा अत्याधुनिक उपकरणांसह उपलब्ध.
सामान्य विभाग (५०० खाटा) : जेरियाट्रिक, मेडिकल आणि सर्जिकल वॉर्डसह ईएनटी, ऑर्थोपेडिक, ट्रॉमा केअर, आयसीयू, आयसोलेशन, बर्न, टीबी-चेस्ट, एसएनसीयू, एनआरसी आणि सायकियाट्रिक वॉर्डचा समावेश.
महिला व बाल विभाग (२०० खाटा) : प्रसूतीपूर्व व पश्चात कक्ष, इक्लेम्पसिया कक्ष, बालरोग वॉर्ड, मेंदू-हृदय-मूत्रपिंड शस्त्रक्रिया, प्रगत डायलिसिस, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध.

एमआरआय, सीटी स्कॅन
माता व बाल मृत्युदर कमी करण्यासाठी स्वतंत्र आधुनिक आयसीयू तसेच नवजात शिशूंच्या उपचारासाठी विशेष युनिट तयार केले आहे. याशिवाय एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे आणि लॅबची आधुनिक साधनसामग्री बसविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना चाचण्या करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com