वाढवण बंदर प्रकल्पसाठी ५३ हजार कोटी गुंतवणूकिसाठी स्वारस्य

वाढवण बंदर प्रकल्पसाठी ५३ हजार कोटी गुंतवणूकिसाठी स्वारस्य

Published on

वाढवण बंदर प्रकल्पात ५३ हजार कोटींचे स्वारस्य
अदाणी समूहाचे व्यवस्थापनासोबत दोन सामंजस्य करार
पालघर, ता. २ : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या उभारणीसाठी अदाणी समूह सरसावला असून, समूहाच्या ‘अदाणी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनोमिक झोन’ या कंपनीने सुमारे ५३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत स्वारस्य दाखवले आहे. यासाठी कंपनीने जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणासोबत (जेएनपीए) दोन महत्त्वाचे सामंजस्य करार केले आहेत. गोरेगाव येथे २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या इंडिया मेरिटाइम सप्ताहात हे करार करण्यात आले.
किनारी भागातील भौतिक आणि विकासकामांसाठी २६,५०० कोटी रुपयांचा पहिला करार करण्यात आला आहे. अदाणी कंपनीचे पूर्णवेळ संचालक असलेले अश्विनी गुप्ता यांनी तसेच जेएनपीएने या करारावर सह्या केल्या आहेत. उर्वरित २६,५०० कोटी रुपयांचा दुसरा करार कंटेनर टर्मिनलच्या उभारणीसाठी आणि गुंतवणुकीसाठी आहे. या कामासाठीच्या निविदेत सहभाग घेण्यासाठी कंपनीने स्वारस्य दाखवले आहे. वाढवण बंदर जागतिक क्रमवारीतील सर्वात मोठे बंदर असून, भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी व सागरी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण बंदर आहे. त्या दृष्टीने हे करार महत्त्वाचे मानले जात आहेत.
वाढवण बंदर प्रकल्प हा जगातील १० बंदर प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असून, भारताच्या सागरी व्यापारासोबत अर्थव्यवस्थेला भक्कम करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नऊ कंटेनर उभारणीसाठी कामाच्या प्रक्रियेत सहभाग दाखवण्यासाठी अदाणी समूहाने दाखवलेले स्वारस्य महत्त्वपूर्ण आहे, असे जेएनपीएचे उपाध्यक्ष व वाढवण पोट प्रोजेक्ट लिमिटेडचे पदाधिकारी उमेश वाघ यांनी म्हटले आहे. ज्या कामांसाठी स्वारस्य दाखवले आहे त्या कामांची रीतसर निविदा आणि पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असेही वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

प्रकल्पाची रचना
वाढवण प्रकल्प जेएनपीए (७६ टक्के भागीदारी) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ (उर्वरित भागीदारी) यांच्या संयुक्त भागीदारीतून उभारला जाईल. हरित वाढवण बंदर प्रकल्प समुद्रात बांधला जाईल आणि त्यासाठी १,४४८ हेक्टर समुद्री क्षेत्रावर भराव केला जाईल. यापैकी २०० हेक्टरच्या जवळपासची जमीन किनारा क्षेत्रामध्ये समुद्री संरक्षण भिंत व भराव यासाठीची आहे. खनन, समुद्री भराव, किनारी संरक्षणाची कामे ही हायब्रिड अन्युईटीअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारीतून केली जाणार आहेत. या कामांसाठी २० हजार ६४७ कोटींचा खर्च होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त प्रकल्पाची असलेली ३७,२४४ कोटींची गुंतवणूक कंटेनर टर्मिनलसाठी खासगी व्यवस्थापन, बहुउद्देशीय बर्थ, किनारा कार्गो बर्थ, रोरो सेवा, द्रव पदार्थांचे बर्थ यासाठी वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड यांच्याकडून प्रक्रियेनुसार निवडले जाणार आहेत. वाढवण बंदरची क्षमता २९८ मिलियन टन कार्गो एवढी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com