अंबरनाथ मतदार याद्यांमध्ये ''घोळ''
अंबरनाथ मतदार याद्यांमध्ये ''घोळ''
महाविकास आघाडीची निवडणूक आयोगावर टीका
अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : अंबरनाथ नगरपालिकेने नुकतीच अंतिम मतदार यादी जाहीर केली असली, तरी या यादीत तब्बल तीन हजार मतदार चुकीच्या प्रभागात नोंदवल्याचाआरोप महाविकास आघाडीने केला आहे. या प्रकारावरून महाविकास आघाडी आक्रमक झाली असून, त्यांनी थेट निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
मतदार यादीतील कथित घोळाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी (ता. २) हुतात्मा चौकातील तोरणा गेस्ट हाउस येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील, मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सलीम खान, ठाकरे गटाचे अनिल भोईर आदी या वेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवर तीव्र संताप व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदीप पाटील यांनी आरोप केला की, मतदार याद्या ठेकेदारांच्या माध्यमातून तयार करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ठेकेदारांच्या आदेशावरूनच नावे घालण्यात आली आहेत. काही प्रभागांमध्ये तीन किलोमीटर अंतरावर असलेली नावे एकाच यादीत टाकण्यात आली आहेत. उल्हासनगरचे नगरसेवक आणि माजी महापौर यांचीही नावे अंबरनाथच्या यादीत आढळली आहेत. निवडणुका घाईने घेण्याची काहीच आवश्यकता नसून, प्रथम यादी शुद्ध करावी, त्यानंतरच निवडणुकीची प्रक्रिया सुरू व्हावी. अशी त्यांनी मागणी केली आहे.
मनसेचे शैलेश शिर्के यांनी पाटील यांच्या आरोपांना दुजोरा दिला आणि हा प्रकार ‘ठेकेदारशाहीचा’ शिखरबिंदू असल्याचे म्हटले. ‘‘अनेक नागरिकांनी आधार कार्डसह योग्य कागदपत्रे सादर करूनही त्यांची नावे याद्यांमध्ये आली नाहीत. काही ठिकाणी तर ३० पेक्षा जास्त नावे चुकीच्या प्रभागात आढळली आहेत.’’ विधानसभेच्या मतदार याद्या वापरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची घाई म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे.
हरकतींचा निपटारा न झाल्याचा दावा
अंबरनाथ पालिका क्षेत्रात नाव, पत्ता, लिंग, वय बदलणे आणि दुबार नोंदी व मृत नावे वगळणे यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत सुमारे १० हजार हरकती प्राप्त झाल्या होत्या. महाविकास आघाडीचा आरोप पालिकेने या हरकतींचा योग्य निपटारा न करता अंतिम यादी घाईगडबडीत जाहीर केली. मतदार याद्या पूर्णपणे तपासून, दोष दुरुस्त करून, पारदर्शकतेने अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी. त्यानंतरच निवडणुका जाहीर कराव्यात. अशा मागण्या महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

