टिटवाळ्यातील आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राचे भूमीपूजन
आयुष्मानच्या माध्यमातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार
मांडा टिटवाळ्यातील आरोग्य केंद्राचे भूमीपूजन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबवलेल्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देशभरात आरोग्य केंद्रांची उभारणी केली जात असल्याचा विश्वास कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या निधीतून आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या पाठपुराव्याने मांडा टिटवाळ्यातील आयुष्मान भारत आरोग्य केंद्राचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या वेळी ते बोलत होते.
मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशभरात जनकल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये आयुष्मान भारत योजना ही जनतेसाठी वरदान ठरली आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच लाखांपर्यंत आरोग्य सहाय्य मिळते. एका घरातील पाच व्यक्तींसाठी २५ लाखांपर्यंत मदत मिळू शकते. ऑपरेशनपासून ते उपचारांपर्यंत सर्व सुविधा सरकारच्या मदतीने उपलब्ध होतात. या योजनेंतर्गतच टिटवाळा परिसरात हे आरोग्य केंद्र उभारले जात असून, आसपासच्या परिसरातील हजारो लोकांना याचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
पवार पुढे म्हणाले की, सरकारच्या निधीतून उभे राहणारे हे केंद्र परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे नवे दालन ठरणार आहे. केंद्राच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे. या आरोग्य केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक उपचार, तपासणी आणि सरकारी योजनांचा लाभ सहज उपलब्ध होणार आहे. मोदी सरकारच्या योजनांमुळे आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात आरोग्यसेवा पोहोचत असल्याची ग्वाही त्यांनी दिली, तर उपेक्षा भोईर यांनी सांगितले की, सरकारच्या निधीतून महाराष्ट्रभर साडेसातशेहून अधिक आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी कल्याण-डोंबिवली हद्दीत तब्बल ४५ केंद्रांची उभारणी होत आहे. त्यापैकी एक टिटवाळ्यात असून, हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी भाजप टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी नगसेवक सुरेश भोईर, बुधाराम सरनोबत, परेश गुजरे, किरण रोठे, दीपक कांबळे, रुपेश भोईर, विनायक भोईर, अनिल फड, विजय आव्हाड, संतोष शिंगोळे, हेमंत गायकवाड, यशोदा पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

