विलेपार्लेतील दूर्वांकुर सोसायटीत दूषित पाणी
विलेपार्लेतील दूर्वांकुर सोसायटीत दूषित पाणी
मालाड, ता. ४ (बातमीदार) ः विलेपार्ले पूर्वेतील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दूर्वांकुर सोसायटीत मागील काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. या परिसरात जवळपास दोन ते अडीच हजार लोकवस्ती असून, सर्व घरांमधील नळांतून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.
या भागात अनेक लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक राहतात. अशा दूषित पाण्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्यात अशुद्ध घटक असल्याने पोटाचे विकार, त्वचारोग आणि संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढला आहे.
रहिवाशांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी त्वरित पाणीपुरवठ्याची तपासणी करून स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आम्ही दररोज हेच गढूळ पाणी वापरतो. लहान मुलांना त्रास होईल की काय याची चिंता वाटते, असे रहिवासी उत्कर्ष बोर्ले यांनी सांगितले.

