बदलत्या ऋतू चक्रात थंडी गायब
सरळगाव, ता. ४ (बातमीदार) : नोव्हेंबरमध्ये थंडीचा कडाका जाणवण्याऐवजी यंदा हवामानात अनपेक्षित बदल दिसून येत आहे. पावसाळ्याने उन्हाळ्याबरोबरच ‘महाआघाडी’ करून थंडीला सत्तेपासून दूर ठेवले का?, अशी गंमतीशीर वाक्य सध्या ग्रामस्थांमध्ये रंगत आहेत.
नोव्हेंबर आला की गारठा, धुके आणि थंडीला सुरुवात होते. यंदा मात्र परिस्थिती उलटी झाली आहे. अवकाळी पावसामुळे ना थंडी, ना उन्हाळा, अशी अजब स्थिती निसर्गात निर्माण झाली आहे. राजकारणात जसे विचारभेद असूनही एखाद्याला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी युती केली जाते, तशीच युती निसर्गानेही केली आहे का, असा सवाल ग्रामस्थ विनोदाने विचारत आहेत. दरम्यान, कधी ऊन तर कधी पाऊस अशा लहरी हवामानामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावरही होत असून दवाखाने रुग्णांनी भरल्याचे दिसून येत आहे. या अनियमित हवामानामुळे निसर्गातील समतोल ढासळल्याची जाणीव सर्वांनाच होत आहे. त्यामुळे थंडीचा हंगाम येईल की नाही, हा प्रश्न आता ग्रामस्थांना पडू लागला आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
भातकापणीच्या हंगामात झालेल्या या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे, आजारी पडलेल्या नागरिकांचे कंबरडे डॉक्टरांच्या बिलामुळे मोडत आहे, अशी व्यथा स्थानिकांनी व्यक्त केली.

