अवकाळी पावसाचा मेट्रो प्रवाशांना फटका
अवकाळी पावसाचा मेट्रो प्रवाशांना फटका
कागदी तिकिटे भिजल्याने स्कॅनिंगमध्ये अडथळे; प्रवाशांचा संताप
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : अवकाळी पावसाने नवी मुंबईतील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण केल्या असतानाच आता या पावसाचा फटका मेट्रो प्रवाशांनाही बसू लागला आहे. बेलापूर ते पेणधर या मार्गावरील मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना दिली जाणारी कागदी तिकिटे पावसामुळे भिजत असून, स्कॅनिंग मशीन ती वाचण्यात अयशस्वी ठरत आहे. परिणामी अनेक प्रवाशांना प्रवेशद्वारांवर थांबावे लागत असून, रांगा वाढत आहेत.
दररोज हजारो प्रवासी या मेट्रो सेवेमधून प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तिकिटे ओली होत असल्याने स्कॅनिंग प्रणाली अडखळते. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा नवीन तिकीट घ्यावे लागते किंवा तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागते. यामुळे वेळेचा अपव्यय होतो आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात प्रवासी स्नेहल पाटील यांनी सांगितले, की ऑफिसमधून निघताना अचानक पाऊस आला आणि माझे तिकीट भिजले. स्कॅन न झाल्याने मला पुन्हा लाईनमध्ये उभे राहावे लागले. तर रवि भोसले म्हणाले, की सकाळी ऑफिसला येताना तिकीट भिजल्याने पुन्हा तिकीट काढावे लागले. त्यामुळे मला लेट मार्क बसला. कॉलेज विद्यार्थी अक्षय म्हात्रे याने संताप व्यक्त करीत म्हटले, की तिकीट व्यवस्थित ठेवता येत नाही का, असा प्रश्न विचारल्यावर मेट्रो अधिकाऱ्यांनी आमच्याशी उर्मटपणे वागणूक दिली.
...............
चोकट
डिजिटल तिकिटिंगची सुविधा द्यावी
दरम्यान, प्रवाशांचा वाढता त्रास लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वॉटरप्रूफ तिकिटे किंवा डिजिटल तिकिटिंगची सुविधा लागू करण्याची मागणीही करण्यात येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस शहरात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने या समस्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

