नोबेल पारितोषिक संवाद भारत २०२५

नोबेल पारितोषिक संवाद भारत २०२५

Published on

सांस्कृतिक देवाणघेवाणीतून सामाजिक विकास
नोबेल पारितोषिक संवादात जेम्स रॉबिन्सन यांचे मत
मुंबई, ता ५ : प्रत्येक संस्कृती दुसऱ्याकडून काहीतरी शिकत असते. एकमेकातील चांगल्या बाबी स्वीकारत नव्याने विकसित होत असते. विविध संस्कृतींतील विचारांच्या देवाणघेवाणीतून सामाजिक विकास होतो, असे प्रतिपादन २०२४चे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते जेम्स रॉबिन्सन यांनी व्यक्त केले. टाटा ट्रस्टच्या विशेष सहकार्याने भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर येथे आयोजित ‘नोबेल पारितोषिक संवाद भारत २०२५’ कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमात नोबेल पारितोषिक विजेते, नामांकित शास्त्रज्ञ, विचारवंत आणि विद्यार्थ्यांनी ‘आपल्याला हवी असलेली भविष्यकाळाची दिशा’ यावर सर्वसमावेशक चर्चा केली. रॉबिन्सन म्हणाले, ‘‘कोणतीही संस्कृती ही एकमार्गी नसते. ती द्विमार्गी वा बहुमार्गी असते. ती दुसऱ्या संस्कृतीकडून काही ना काही स्वीकारत असते. दोन किंवा अधिक संस्कृतींमध्ये वैचारिक देवाणघेवाण झाल्याने त्यांचा विकास होतो. त्यातून पर्यायाने सामाजिक विकासही घडतो.’’ रसायनशास्त्रातील २०२१चे नोबेल विजेते डेव्हिड मॅकमिलन यांनी ऑर्गेनोकॅटॅलिसिस संशोधनाची ताकद आणि सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘‘जगाला विज्ञानाचे महत्त्व अधिक स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. आपण हवामान बदलावर मात करण्यापासून केवळ एका ‘कॅटॅलिटिक रिॲक्शन’च्या अंतरावर आहोत. भारताची ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रगतीची ओढ पाहून मी थक्क झालो आहे.’’
---
जागतिक विकासाच्या आव्हानांवर विचारमंथन
भारताच्या नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मोंटेक सिंग आहलुवालिया, रॉबिन्सन आणि ओनी यांच्यासह झालेल्या चर्चेत जागतिक विकासाच्या आव्हानांवर विचारमंथन केले. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी जागतिक आरोग्याशी निगडित धोके आणि भारताची लस विकासातील प्रगती यावर प्रकाश टाकला. समारोप सत्रात मॅकमिलन, कांग आणि बायोटेक उद्योजक कुश परमार यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवजाती व पृथ्वीच्या कल्याणासाठी कसे उपयोगी ठरू शकते, यावर चर्चा केली.
----
तरुणांसाठी नव्या संधी आवश्यक
भारताची खरी संपत्ती नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये नसून तिच्या लोकांमध्ये आणि त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेत आहे. या विश्वासातूनच टाटा ट्रस्टने शैक्षणिक वारसा जोपासला आहे. ज्ञान हे मानवतेच्या सेवेसाठी वापरले गेले पाहिजे. आज आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहोत. पण या भविष्याचा पाया सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायावर आधारित असायला हवा. त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आणि नवीन संधी निर्माण करणे आवश्यक आहे, असे टाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com