जुन्या खेळांचा अनोखा उपक्रम

जुन्या खेळांचा अनोखा उपक्रम

Published on

किरवली-चोबारेत रंगला बालोत्सव
पारंपरिक खेळांद्वारे लहानग्यांना संस्कृतीची ओळख
विरार, ता. ५ (बातमीदार) ः किरवली आणि चोबारे गावाने लहान मुलांसाठी बालोत्सव २०२५अंतर्गत अनोखा उपक्रम राबवला आहे. किरवली गावातील मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये एकूण पारंपरिक १८ खेळांची ओळख लहानग्यांना करून देण्यात आली, तर अनेक खेळ खेळायला दिले. एकूण ८६ मुलं, मुली या बालोत्सवात सहभागी झाली होती.
वसई पश्चिम पट्ट्यातील किरवली आणि चोबारे या गावांत भंडारी, वाडवळ आणि ख्रिश्चन समाजाची वस्ती आहे. गावातील तिन्ही समाजांतील नवीन पिढीला जुना इतिहास व माणसं परिचित व्हावी आणि गावपातळीवर एकात्मता प्रस्थापित राहावी या उद्देशाने गेल्या वर्षीपासून गावांतील काही तरुण मंडळींनी एकत्र येऊन किरवली चोबारे मान्सून प्रीमियर लीग या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जून महिन्यात किरवली येथे केले होते. याच धर्तीवर बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बाल समाज उन्नती मंडळ, मूलगामी ख्रिस्ती संघटना आणि नवदुर्गा मित्रमंडळ या संस्थांचे मोठे सहकार्य लाभले आहे.
याप्रसंगी सोमवंशी क्षत्रिय वाडवळ समाजाचे मिलिंद म्हात्रे, चित्तरंजन म्हात्रे, शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाचे मिलिंद म्हात्रे, माजी सरपंच जोनस परेरा, अनिल वर्तक, वसई विकास बॅंक संचालक राजेश पाटील आदी मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरवली व चोबारे ग्रामस्थांनी मोठे सहकार्य केले. बच्चेकंपनीने या बालोत्सवात खेळांचा मनमुराद आनंद लुटला आणि यापुढेही हे खेळ असेच खेळणार असल्याचे आनंदाने सांगितले.

१८ जुने खेळ
८ ते १५ या वयोगटातील लहान मुला-मुलींसाठी बालोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये लगोरी, विटीदांडू, भोवरा, गोट्या, आंधळी कोशिंबीर, खापरी पास, आट्यापाट्या, आबाधुबी, रस्सीखेच, दोरी उड्या, कांदेफोडी, इंडा, टायर फिरविणे, गरईची मासेमारी यांसारख्या खेळांची ओळख आणि खेळ खेळायला दिले. मुलामुलींना खेळ समजावून देण्यासाठी आणि त्यांना योग्यरीतीने सांभाळण्यासाठी गावातील तरुण स्वयंसेवक म्हणून उपलब्ध होते.

मातीतल्या खेळांत रमण्यासाठी प्रवृत्त
मुलांना मोबाईलपासून दूर ठेऊन रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या या मातीतल्या खेळांत रमण्यासाठी प्रवृत्त करणे. मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि इतर समाजातील मुलांशी परिचय या उद्देशाने अशा बालोत्सवाचे आयोजन होणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com