आंबा पिक विमा परताव्याची प्रतीक्षा

आंबा पिक विमा परताव्याची प्रतीक्षा

Published on

आंबा पीक विमा परताव्याची प्रतीक्षा
कंपन्यांकडून विलंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश
तळा, ता. ५ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पीक विम्याचा परतावा मिळालेला नाही. विमा रक्कम भरूनही आणि पिकाचे मोठे नुकसान सहन करूनही अजूनपर्यंत परतावा न मिळाल्याने शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आमच्या हक्काचा पैसा कोण अडवत आहे, असा संतप्त सवाल शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात तळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देत हा गंभीर विषय तातडीने निकाली काढावा, अशी मागणी केली आहे. त्यानंतर कृषीमंत्री दत्ता भरणे, खासदार सुनील तटकरे, कृषी आयुक्त आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या उपस्थितीत मंत्रालयात २८ ऑक्टोबर रोजी विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत तळा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, उपाध्यक्ष रवींद्र मांडवकर, सचिव कैलास पायगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत तळा मंडळासाठी प्रती हेक्टरी ७३ हजार रुपये तर सोनसडे मंडळासाठी हवामान पुनर्पाहणी केल्यानंतर प्रती हेक्टरी ६८ हजार रुपये परतावा देण्याबाबत चर्चा झाली, मात्र विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सोनसडे मंडळात मे महिन्यात पाऊस पडला नाही, असा दावा करत परतावा देण्यास टाळाटाळ केली. यावर शेतकऱ्यांनी ठोस पुरावे दाखवत, मे आणि त्यानंतरही सलग पाऊस झाला होता, असा युक्तिवाद केला. शेतकरी संघटनेने स्पष्ट केले की, तालुक्यात बसवलेली हवामान यंत्रे नीट कार्यरत नसल्याने चुकीचा डेटा तयार होतो आणि त्यावर आधारित विमा कंपन्या परतावा थांबवतात. दरवर्षी हाच प्रकार घडतो. आम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सहभागी असूनही लाभ मिळत नाही. मग आमच्यासाठी ही योजनेचा काय उपयोग, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला.
.................
३० नोव्‍हेंबर शेवटची तारीख
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांवरही दुर्लक्षेचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि विमा कंपन्यांच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल मिळत नाही. आता आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी चेतावणी तळा तालुक्यातील आंबा उत्पादकांनी दिली. दरम्यान, २०२५-२०२६ हंगामासाठी आंबा पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे, मात्र मागील हंगामाचा परतावा अजूनही मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटत चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com