आदिम समाजासाठी ‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : आदिवासी, कातकरी समाजाच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकाऱ्यांनी ‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ मौन पाळून बुधवार (ता. ५)पासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात केली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांच्या श्रमाचा अमानुष बाजार सुरू आहे. लहान मुलांचे बालपण खुडून नेले जाते. अनेकांना मजुरी अथवा विवाहामुळे त्यांचे माणूस म्हणून जगणेच नाकारले जात आहे. दारिद्र्य, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उद्ध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे. श्रमजीवी संघटनेने आता या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचलले आहे.
निरक्षर आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री, कर्जबाजारीमुळे पुन्हा वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंध:कारात लोटले गेले आहे. वनहक्क, गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिगारांचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, महासचिव बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, संघटक सचिव सीता घाटाल, पूजा सुरूम-माळी, रुपेश डोले, ठाणे जिल्हा महिलाप्रमुख जया पारधी, पालघर जिल्हा महिलाप्रमुख रेखा पऱ्हाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करत आहेत.
गाव-पाड्यांतही आत्मनिर्धाराचा प्रतीकात्मक दिवा
अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे सरकार आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गाव-पाड्यांत सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक घरा-दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतीकात्मक दिवा लावणार आहेत. आंदोलनस्थळीही आज हा दिवा संध्याकाळी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

