बदलत्या समीकरणांमुळे चूरस

बदलत्या समीकरणांमुळे चूरस

Published on

पालघर, ता. ५ : नगर परिषदेमध्ये राजकीय समीकरणे बदलली आहेत. मित्रपक्षांतर्गत वाद, मित्रपक्षांमधील रुसवा आणि पदाधिकाऱ्यांचे स्थलांतर, इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी, इच्छुकांची नाराजी, अशा अनेक कारणांमुळे पालघर नगर परिषदेची आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

पालघर नगर परिषदेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वर्चस्व आहे, मात्र या गटातील बहुतांश सदस्य भाजप आणि शिंदे गटाकडे गेल्यामुळे ठाकरे गट एकाकी पडला आहे. तसेच शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांच्यात अंतर्गत कलह असल्यामुळे नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांसाठी स्वतंत्र लढण्याचा नारा दोन्ही पक्षांनी दिल्यामुळे या निवडणुकीला आणखीन रंगत येणार आहे. शिंदे गट आणि भाजप स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता आहे. याआधी नगराध्यक्षासह दोन सदस्य शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, मात्र दोन नगरसेवक भाजप आणि शिवसेनेमध्ये स्थलांतर झाल्यामुळे या पक्षातील आता केवळ एक सदस्य तटस्थ राहिला आहे. यापूर्वी पाच अपक्ष सदस्य निवडून आले होते. त्यापैकी चार सदस्य भाजप आणि शिवसेनेकडे गेले आहे. त्यामुळे आता एक सदस्य तटस्थ राहिला आहे.

प्रत्येक पक्षाकडे आवश्यक असलेले चेहरे उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्या दृष्टीने बैठकांचे सत्रही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पालघर नगर परिषदेची निवडणूक एकतर्फी न होता अत्यंत चुरशीची होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. सर्वच पक्षांनी जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

प्रमुख पक्षांची ताकद पणाला
एकंदरीत गेल्या काही महिन्यांतील पालघर शहरातील राजकीय बलाबल लक्षात घेता शिंदे गट आणि भाजपची ताकद वाढली आहे. भाजपने नगर परिषदेवर दावा करून नगराध्यक्षपद घेण्याच्या तयारीत आहे, तर शिंदे गटही आपल्या नगराध्यक्षपदासाठी दावेदारी करत आहे. दोन्हीही पक्ष स्वतंत्र लढल्यास या पदासाठी मोठी चुरस होणार आहे. भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट, शरद पवार गट स्वतंत्र लढणार असल्यामुळे चारही पक्ष आपली ताकद पणाला लावणार आहेत.

तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न
तरुण मतदारांची संख्या या वेळी लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे प्रचारात समाजमाध्यमाला मोठे महत्त्व येणार आहे. स्थानिक पातळीवरील लहान पक्ष व कार्यकर्तेही निर्णायक भूमिका बजावतील, अशी शक्यता आहे. प्रमुख राजकीय पक्ष तरुणांना केंद्रस्थानी ठेवून समाजमाध्यमांचा भरमसाट वापर करणार असल्याचे एकंदरीत दिसून येते.

विकास, भ्रष्टाचार मुद्द्यांना प्राधान्य
पालघर शहरात गेल्या काही वर्षांत गटार, रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, तसेच स्वच्छतेची कमतरता या नागरी समस्यांमुळे नागरिक नाराज आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक विकास विरुद्ध भ्रष्टाचार अशा मुद्द्यांवर लढवली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com