थोडक्यात बातम्या नवी मुंबई
नवी मुंबईत संक्रमण शिबिराच्या आयोजनाची मागणी
जुईनगर (बातमीदार) : नवी मुंबईतील बहुतांश इमारती सिडकोने बांधल्या असून, त्यांना आता ३० ते ४० वर्षांचा कालावधी उलटला आहे. परिणामी अनेक इमारतींची स्थिती अत्यंत जीर्ण झाली आहे. काही इमारतींमध्ये स्लॅब पडणे, भिंतींना व कॉलमना चिरा जाणे, असे प्रकार घडत आहेत. अनेक इमारती दुरुस्तीसाठी अयोग्य ठरल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात अशा इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष सुतार यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांना पत्र देऊन शहरात ‘संक्रमण शिबिर’ आयोजित करण्याची मागणी केली आहे. धोकादायक इमारतींतील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. नवी मुंबईत वाढत्या इमारत दुर्घटनांपासून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने कृती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
.............
नागरी समस्या कळविण्याचे आवाहन
जुईनगर (बातमीदार) : निवडणुकांचे बिगुल वाजल्याने समाजसेवक आणि संभाव्य उमेदवार नागरिकांशी संपर्क साधत कामाला लागले आहेत. ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जुईनगर परिसरातील समाजसेवक देवनाथ म्हात्रे यांनी नागरिकांना आपल्या परिसरातील तक्रारी व समस्या थेट कळविण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रस्ते, गटारे, पाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन यांसारख्या नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून थेट प्रशासनाशी संवाद साधून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यांनी आतापर्यंत प्रभागातील अनेक लहान-मोठ्या समस्या मार्गी लावल्या असून, नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून तक्रारींचे निराकरण करण्यावर भर दिला आहे. समाजसेवक म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून ‘लोकांशी जोडलेपण राखणे हेच खरी सेवा’ असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
..........
महिलांना आरी वर्क किटचे वाटप
नेरूळ (बातमीदार) : भारतीय जनता पार्टी प्रभाग २१ मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या महिला प्रशिक्षण उपक्रमांतर्गत आरीवर्क (भरतकाम) प्रशिक्षण घेणाऱ्या १५० महिलांना मोफत प्रशिक्षण साहित्याचे वितरण करण्यात आले. या किटची किंमत सुमारे दीड लाख रुपये असून, प्रत्येक महिलेला सुमारे एक हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले. काही महिलांना आर्थिक अडचणींमुळे हे साहित्य विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे समाजसेवक जयेंद्र सुतार यांनी स्वतःच्या पुढाकाराने हे साहित्य खरेदी करून वाटप केले. या कार्यक्रमास माजी नगरसेविका माधुरी सुतार उपस्थित होत्या. महिलांनी या मदतीबद्दल जयेंद्र सुतार यांचे आभार मानले. या प्रशिक्षणामुळे महिला स्वावलंबी बनतील, तसेच कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
.............
सीबीडी बेलापूर येथे योगा प्लॅटफॉर्म
नेरूळ (बातमीदार) : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून विविध विकासकामांना गती मिळत आहे. सीबीडी बेलापूर येथील दुर्गामाता नगरात सभा मंडप बांधकामासाठी २५ लाख आणि लायन्स पार्कमध्ये योगा प्लॅटफॉर्म व निवारा शेडसाठी ५० लाख निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या दोन्ही कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन भाजप महामंत्री व माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरी सुविधांचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले. कार्यक्रमास अजय सिंग, मनोहर बाविस्कर, प्रभाकर कांबळे, मलेश राठोड, जयदेव ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे बेलापूर परिसरातील आरोग्य, मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी अधिक सक्षम सुविधा निर्माण होतील.
..............
आपत्ती निवारणासाठी प्रात्यक्षिकांद्वारे जनजागृती
वाशी (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारणदिनानिमित्त विविध जनजागृती उपक्रम राबवले. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ५० हून अधिक ठिकाणी पथनाट्ये आयोजित करून नागरिकांना आपत्ती काळातील सजगतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. आपत्तीपूर्व तयारी, आग प्रतिबंधक उपाय, बचाव कार्य आणि आपत्तीनंतरची पुनर्बांधणी याविषयी माहिती देण्यात आली. तसेच अग्निशमन विभागाने मॉल्स, शाळा, महाविद्यालये आणि उंच इमारतींमध्ये अग्निशमन प्रात्यक्षिके सादर करून उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण दिले. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपआयुक्त ललिता बाबर, व शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याने या उपक्रमाला मोठे यश मिळाले.
................
सीए परीक्षेत धनश्री कोंढाळकरचे यश
खारघर (बातमीदार) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत खारघरची धनश्री भरत कोंढाळकर हिने उल्लेखनीय यश मिळविले आहे. तिचे वडील कृष्णा कोंढाळकर हे भाजप उद्योग आघाडीचे खारघर मंडळ अध्यक्ष आहेत. धनश्रीने अभ्यासात सातत्य आणि कष्ट याद्वारे हे यश संपादन केले असून, तिच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सीएसारख्या कठीण परीक्षेत स्थान मिळवणे हे तिच्या मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे नागरिकांनी सांगितले. धनश्रीने पुढे वित्तीय क्षेत्रात उत्कृष्ट कारकीर्द घडवण्याचा संकल्प व्यक्त केला असून, तिच्या यशामुळे खारघर परिसराचा मान उंचावला आहे.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

