नवी मुंबईत प्लॅस्टिक बंदीला हरताळ

नवी मुंबईत प्लॅस्टिक बंदीला हरताळ

Published on

नवी मुंबईत प्लॅस्टिक बंदीला हरताळ
शहरात पुन्‍हा वाढला पिशव्यांचा सर्रास वापर
वाशी, ता. ६ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा प्लॅस्टिकचा वापर वाढू लागला असून, फेरीवाले, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, स्वीट मार्ट यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पिशव्यांचा वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे काही काळ कचऱ्यातून गायब झालेल्या प्लॅस्टिक पिशव्या पुन्हा दिसू लागल्या आहेत.
राज्य सरकारने मे २०१८ मध्ये प्लॅस्टिक व थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना काढली होती. त्यानंतर राज्यभरातील सर्व महापालिकांना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने देखील प्लॅस्टिक वापरावर मोठी मोहीम राबवली होती. प्लॅस्टिक आढळल्यास व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. काही काळ या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळाला. परंतु आता पुन्हा एकदा परिस्थिती बदलली असून प्लॅस्टिक पिशव्या खुलेआम वापरल्या जात आहेत. पालिका प्रशासनाकडून नियमित तपासणी आणि कारवाई सुरू असतानाही पिशव्या वापरण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. विशेषतः भाजी विक्रेते, फेरीवाले आणि लहान दुकानदार यांच्याकडून पिशव्या ग्राहकांना दिल्या जात आहेत. काही विक्रेत्यांनी सांगितले की, पिशवी दिली नाही तर ग्राहक नाराज होतात किंवा दुसऱ्या दुकानातून खरेदी करतात, त्यामुळे आम्हाला पिशव्या ठेवाव्या लागतात. राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी लागू करून सहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी नवी मुंबईत काही ठिकाणी चोरट्या तर काही ठिकाणी खुलेआम प्लॅस्टिक वापर सुरू आहे. सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा जाड प्लॅस्टिक पिशव्यांना काही अटींवर परवानगी दिल्याचा व्यापाऱ्यांनी चुकीचा अर्थ लावत बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. किराणा दुकानदार कमी मायक्रॉनच्या पिशव्यांमध्ये धान्य, मसाले विक्री करत आहेत. एपीएमसी मार्केट, सेक्टरमधील भाजी मंडई आणि मासळी बाजारातही हीच स्थिती दिसून येते.
..................
बॉक्स
महापालिकेकडून प्लॅस्टिक पिशव्या ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियमित कारवाई केली जाते. नागरिकांनीही प्लॅस्टिक पिशवी घेणे टाळावे आणि कागदी किंवा कापडी पिशव्या वापराव्यात. याबाबत जनजागृतीसाठी मोहिमा चालवल्या जात आहेत, असे पालिका उपायुक्‍त डॉ. अजय गडदे यांनी सांगितले. तर केवळ व्यापाऱ्यांवर कारवाई करून उपयोग नाही, प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवरही दंड आकारणे आवश्यक आहे. तसे केल्याशिवाय या बंदीचा प्रभावी अंमल होऊ शकणार नाही, असे नागरिक सचिन रोडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com