एल्फिन्स्टनसाठी कमी तासांचे ७८ ब्लॉक

एल्फिन्स्टनसाठी कमी तासांचे ७८ ब्लॉक

Published on

एल्फिन्स्टनसाठी कमी तासांचे ७८ ब्लॉक
पाडकामाच्‍या पुढील टप्प्यासाठी मजूर, अभियंते, यंत्रसामग्री सज्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : परळ-प्रभादेवीदरम्यान असलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रिज आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (महारेल)कडून पुल पाडण्यासाठी सुरुवातीला ७२ मेगाब्लॉकची मागणी केली हाेती; मात्र आता यामध्ये आणखी सहा ब्लॉकची भर पडली आहे. महारेलने रेल्‍वे प्रशासनाकडे ७८ मेगाब्‍लॉकची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने ही मागणी लक्षात घेऊन वेळापत्रक पुनःनिर्धारित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या पुलाच्या तोडकामासाठी सुरुवातीला आठ तासांचे मेगाब्लॉक मागविण्यात आले होते, मात्र रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबवणे शक्य नसल्याने कमी वेळेचे आणि अधिक संख्येचे ब्लॉक घेऊन रात्रीच्या वेळी काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ब्लॉक सुमारे चार तासांचा असेल. रेल्वे प्रवाशांच्या सोयीचा विचार करून या ब्लॉकदरम्यान उपनगरी लोकल आणि एक्‍स्‍प्रेस गाड्यांची वाहतूक शक्य तितकी सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद करण्यात आला होता. त्यानंतर महारेलकडून पुलाच्या दोन्ही टोकांवरील अप्रोच भागाचे तोडकाम पूर्ण झाले असून, आता रेल्वे ट्रॅकवरील १३२ मीटर लांबीचा मुख्य भाग पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या टप्प्यासाठीच ७८ ब्लॉकची गरज भासणार आहे.

पूर्वेकडील भागावर काम सुरू
महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लवकरच ट्रॅकवरील भागाचे तोडकाम सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मजूर, अभियंते आणि यंत्रसामग्री सज्ज असून, रात्रीच्या वेळेत काम सुरू केले जाईल. सध्या पुलाच्या पूर्वेकडील भागावर (मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रातील) काम सुरू होईल, कारण पश्चिम रेल्वेकडून अद्याप लिखित परवानगी प्राप्त झालेली नाही, अशी माहिती देण्यात आली.

क्रेन्स तैनात, कामात गती
या कामासाठी ८०० मेट्रिक टन वजन उचलणाऱ्या दोन प्रचंड क्रेन तैनात करण्यात येत आहेत. अप्रोच रोडचा मलबा हटवल्यानंतर या क्रेनच्या सहाय्याने पुलावरील लोखंडी गर्डर आणि जड संरचना सुरक्षितपणे उतरवली जाणार आहेत. या क्रेन आधीच जागेवर पोहोचल्या आहेत.

कामाची वेळ आणि पर्यायी व्यवस्था
या पाडकामासाठी घेतले जाणारे ब्लॉक साधारण चार तासांचे असतील आणि बहुतांश काम रात्रीच्या वेळीच केले जाईल. ब्लॉक वेळापत्रक आणि स्थानिक गाड्यांतील बदलांची अचूक घोषणा मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून पुढील काही दिवसांत केली जाणार आहे. रेल्वे वाहतूक बाधित होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे.
 
प्रकल्पाचा खर्च आणि कालावधी
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, फक्त रेल्वे भागाच्या पुनर्बांधणीचा अंदाजित खर्च १६७.३५ कोटी रुपये असून, संपूर्ण शिवडी-वरळी उड्डाणपलू प्रकल्पाची किंमत १,२८६ कोटी रुपये आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

असे करणार पाडकाम
- एकूण ब्लॉक : ७८
- प्रत्येक ब्लॉकची वेळ : ४ तास
- कामाचे वेळापत्रक : रात्रीच्या वेळेत
- सहभागी यंत्रसामग्री : २ मेगा क्रेन्स (८०० मेट्रिक टन क्षमता)

पूल पाडण्याची प्रक्रिया
 - अप्रोच रोडचा मलबा हटवणे
- क्रेन तैनात करणे
- लोखंडी गर्डर उतरवणे
- संरचना तोडून हटवणे
- नवीन पूल बांधकामासाठी जागा तयार करणे

असा असेल नवा पूल
- खालचा स्तर : वाहन वाहतूक (सेनापती बापट रोड-आंबेडकर रोड जोडणी)
- वरचा स्तर : मेट्रो मार्ग
- जोडणी : वांद्रे-वरळी सी लिंक आणि अटल सेतूशी थेट जोडणार
- पूर्णतः लक्ष्य : डिसेंबर २०२६

रेल्वे विभाग व एकूण प्रकल्पाचा खर्च
- घटक खर्च -  (कोटी रुपये)
- रेल्वे विभागाचा भाग - १६७.३५
- संपूर्ण शिवडी-वरळी प्रकल्प - १,२८६
- पूर्ण होण्याची मुदत - डिसेंबर २०२६
 -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com