कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा
बदलापूर, ता. ५ (बातमीदार) : कात्रप परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू असताना एका दुर्घटनेत कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर ठेकेदार अशोक पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामप्रकाश कुमार मोल्हे (वय ५२ वर्ष) असे मयत कामगाराचे नाव असून, ते दिवाळीच्या दिवसांत २४ ऑक्टोबर रोजी या इमारतीत काम करीत होते.
बदलापूर पूर्वेकडील कात्रप भागात ट्रायडंट एव्हलॉन या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथे अनेक कामगार काम करीत असून, दिवाळीच्या दिवसांमध्ये रामप्रकाश हे या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर टॉयलेटमध्ये फरशा बसवण्याचे काम करीत होते. त्या वेळी पाय घसरून ते इमारतीच्या डक्ट भागात पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर ठेकेदार अशोक पटेल याच्याविरोधात कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याचे कारण दाखवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ठेकेदाराला काम देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला मात्र या प्रकरणात सहिसलामत वाचवल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. इमारतीचे काम सुरू आहे; मात्र या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. संरक्षण जाळी नसल्याने अनेक कामगार जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करताना दिसून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

