जावसई गावात समस्यांचा डोंगर

जावसई गावात समस्यांचा डोंगर

Published on

शीतल मोरे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. ८ : शहराचा पहिला विभाग जावसई ठाकूरपाडा जो चेहरा समजला जातो. आज तोच समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. पाणीटंचाई, विजेचा लपंडाव, खड्डेमय रस्ते, गटारांचा अभाव, अस्वच्छतेचा फैलाव आणि प्रशासनाची बेफिकिरी या सर्वांमुळे नागरिकांचा रोजचा दिनक्रम विस्कळित झाला आहे. प्रशासनाकडे वारंवार धाव घेऊनही प्रश्न सुटत नाहीत. तर स्थानिक लोकप्रतिनिधी लवकरच सुविधा मिळतील, अशा आश्वासनांचा पाऊस पाडत जबाबदारी टाळतात, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

जावसई ठाकूरपाडा परिसरातील उंच भागांमध्ये पाण्याचा प्रश्न कायम आहे. ठाकूरपाडा डिफेन्स कॉलनीत कामगार, निराधार आणि गरीब कुटुंबे राहतात. येथे पाणी आठवड्यातून फक्त दोन-तीन दिवसच येते, तेही कमी दाबाने आणि अनियमित वेळेत. पाण्यासाठी महिलांना कामावरून सुट्टी घ्यावी लागते, मुलांना शाळा चुकवावी लागते. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मात्र या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या वॉर्डात चार ट्रान्स्फॉर्मर असूनही संध्याकाळी अंधार असतो. पाण्यासाठी वापरली जाणारी वीज उपकरणे चालू करताच वीज खंडित होते. तरीही बिल वाढतेच. त्यामुळे नागरिकांना दुहेरी त्रासाचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

खड्डेमय रस्ते आणि अस्वच्छता
जावसई ठाकूरपाडा विभागातील बहुतांश रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यानंतर प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. त्यातच कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ नाले आणि अपुरी घंटागाडी सेवा यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून डेंगी-मलेरियाचा धोका निर्माण झाला आहे.

आश्वासनांचा पाऊस, कृती शून्य
वर्षानुवर्षे दिलेल्या निवेदनांवर प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच; पण कृती शून्य आहे. प्रत्येक निवडणुकीत ‘विकास घडवू, सुविधा देऊ’ अशी घोषणाबाजी होते; पण निवडणुका संपल्यावर ती वचने विसरली जातात, असा नागरिकांचा रोष आहे. नागरिकांमध्ये आता या खोट्या आश्वासनांविरुद्ध नाराजी उसळली आहे. ‘दरवेळी विकासाच्या नावाने फसवणूक होते’, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. कर आम्ही भरतो; पण सुविधा कुठे आहेत, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

अंबरनाथ : जावसई गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com