पालिकेत निवृत्त अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप?

पालिकेत निवृत्त अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप?

Published on

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या मुख्यालयात; तसेच इतर विभागीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेपूर्वी काही निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून कागदपत्रे व संगणक हाताळत असल्याची माहिती समोर आली आहे. ही गंभीर बाब असल्याने याबाबत पालिका मुख्यालय सतर्क झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू करून कारवाईचे संकेत उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिले आहेत.
महापालिकेतील प्रशासन मागील काही वर्षांत वारंवार चर्चेत राहिले आहे. प्रशासकीय राजवटीतही कार्यालयीन कामकाजात शिस्त नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने अनेक विभाग प्रभारी पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत. या पार्श्वभूमीवर निवृत्त अधिकारी कार्यालयात येऊन हस्तक्षेप करत असल्याने प्रशासनाची प्रतिमा धुळीत जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही माजी नगरसेवक, दलाल आणि निवृत्त अधिकारी कार्यालयीन कागदपत्रांवर प्रवेश मिळवून ती हाताळतात, तर काही वेळा सरकारी कागदपत्रे कार्यालयाबाहेर नेली जात असल्याचेही आढळून आले आहे. विशेष म्हणजे, हे प्रकार अनेकदा कार्यालयीन वेळेत वाजण्यापूर्वीच घडतात. यामुळे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
अधिकार नसताना कार्यालयीन कारभारात हस्तक्षेप होणे हे नियमबाह्य असल्याने अनेक नागरिकांनी या प्रकारांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, मुख्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये या घटनांचे चित्रण झाल्याची माहिती समोर आली आहे. ते तपासून जबाबदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

चाव्या, ओळखपत्र न परतवण्याचा प्रकार
निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी निवृत्तीनंतर आपली ओळखपत्रे आणि कार्यालयीन कपाटांच्या चाव्या आस्थापन विभागाकडे जमा करत नाहीत, असे आस्थापनाप्रमुख अजित महाडिक यांनी सांगितले. यामुळेच काही निवृत्त अधिकारी कार्यालयीन वेळेपूर्वीच कार्यालय उघडून कागदपत्रे हाताळतात, असे सांगितले.

महापालिकेच्या मुख्यालयात कार्यालयीन वेळेपूर्वी काही अधिकारी किंवा कर्मचारी येत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची शहानिशा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावरील रखवालदारांनाही सूचना दिल्या जातील; तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- बाळकृष्ण क्षीरसागर, उपायुक्त, भिवंडी महानगरपालिका

निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली ओळखपत्रे व चाव्या आस्थापन विभागाकडे जमा करणे आवश्यक आहे; परंतु आतापर्यंत हे नियम पाळले गेलेले नाहीत.
- अजित महाडिक, आस्थापना प्रमुख, भिवंडी महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com