संघर्षातून प्रियांकाची आकाशाला गवसणी
संघर्षातून प्रियांकाची आकाशाला गवसणी
टिटवाळ्याच्या म्हसकर क्लास १ अधिकारी
टिटवाळा, ता. ६ (वार्ताहर) : टिटवाळ्यातील प्रियांका अनंता म्हसकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेमध्ये क्लास १ अधिकारी बनून यशाचे शिखर गाठले आहे. त्यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
प्रियांका म्हसकर यांचा शैक्षणिक प्रवास जिद्द आणि सातत्याची साक्ष देतो. राष्ट्रीय विद्यालय, टिटवाळा चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. गणेश महाविद्यालयात दहावीत ९३.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. तर
जेएमटी हायस्कूल, वाणगाव, डहाणू येथे बारावी विज्ञान शाखेत ७८.३१ टक्के गुण मिळवले. ठाणे येथील बी. एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. गव्हर्न्मेंट लॉ कॉलेज, चर्चगेट येथून कायद्याचे शिक्षण घेतले. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी. ए. (राज्यशास्त्र) पदवी घेतली आहे.
प्रियांका यांचा एमपीएससीचा प्रवास आव्हानात्मक होता, पण त्यांना अपयशातून शिकून पुढे जाण्याची ऊर्जा मिळाली. २०२२ मध्ये पहिला प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली, पण मुख्य परीक्षेत केवळ तीन गुणांनी मुलाखत टळली. त्यांनी पीएसआय मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली, पण क्लास १ अधिकारी होण्याचे ध्येय असल्याने ती संधी नाकारली. २०२३ मध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून निवड झाली आणि त्या सध्या डहाणू येथे कार्यरत आहेत. नोकरीच्या जबाबदाऱ्यांमध्येही अभ्यास सुरू ठेवून, अखेर २०२४ मध्ये एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत क्लास १ अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
कोविड काळात जुलै २०२२ मध्ये आपल्या मूळ गावी दाभोण येथे ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून मी अभ्यास सुरू केला. कुठेही ऑफलाईन क्लास नव्हता, पण शिकायची इच्छाशक्ती असेल तर काहीही अशक्य नाही. हे यश माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाचं आणि समाजाच्या पाठबळाचं फलित असल्याचे प्रियांका यांनी म्हटले.
कुटुंबाची भक्कम साथ
प्रियांका यांच्या यशात त्यांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे. तिचे वडील अनंता म्हसकर कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी प्रियांकाला लहानपणापासूनच शिक्षणाचे महत्त्व समजावले. तर आई अश्विनी म्हसकर या गृहिणी आहेत.
नव्या पिढीसाठी दीपस्तंभ
प्रियांका म्हसकर यांचे यश सिद्ध करते की, "परिस्थिती नव्हे, तर मनोवृत्ती ठरवते आपण किती उंच झेप घेऊ शकतो." अडथळे हेच यशाच्या वाटेवरील पायऱ्या असतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांचे जीवन आज अनेक तरुणांसाठी स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आणि हार न मानण्याचे जिवंत उदाहरण बनले आहे.टिटवाळ्याची ही कन्या महाराष्ट्राच्या राज्यसेवेतील क्लास १ अधिकारी म्हणून उज्ज्वल पाऊल टाकत आहे. त्यांच्या या तेजस्वी प्रवासासाठी मित्र-मैत्रिणी, शिक्षक आणि नातेवाईकांकडून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

