क्रीडांगणाच्या जागेवर हिरवाईचा खेळ

क्रीडांगणाच्या जागेवर हिरवाईचा खेळ

Published on

दिलीप पाटील : सकाळ वृत्तसंस्था
वाडा, ता. ६ : ग्रामीण भागातील तरुणाईमधील क्रीडा कौशल्ये ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालघर जिल्हा क्रीडा विभाग प्रयत्नशील आहे, मात्र अशा वेळी वाडा तालुक्यातील विजयपूर, कोने येथे जिल्हा क्रीडा अधिकारी विभागाच्या नावे १६ एकर १४ गुंठ्यांचा क्रीडांगण व मनोरंजनासाठी राखीव भूखंड अनेक वर्षांपासून धूळखात पडला आहे.

तालुक्यात एकूण २० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुकास्तरावर क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी काही कोटींची अनुदानाची तरतूद आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रेक्षकगृहासाठी ६७ लाख, तसेच अन्य खेळांसाठी अनुदानाची तरतूद असून हे सर्व कागदोपत्री आहे. फक्त घोषणा न होता निश्चित कालमर्यादेत या धोरणांनी अंमलबजावणी होणे, ही काळाची गरज आहे.

कला व क्रीडा धोरणासाठी आरक्षित असलेला हा भूखंड विकसित झाल्यास वाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यांच्या दुर्गम भागातील तरुणांच्या क्रीडा व कला गुणांना योग्य वाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. या भागातील तरुणांमध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत हे सर्व गुण आहेत. त्यांना फक्त सुविधा मिळाल्यास राज्य पातळीपर्यंत धडक मारणारे खेळाडू हे ऑलिम्पिकमध्येही चमकू शकतात, यामध्ये दुमत नाही, मात्र त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.

केरळच्या धर्तीवर धोरण
तालुकागणिक क्रीडांगण उभारण्याचे धोरण दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात जाहीर झाले होते, मात्र प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झाली नाही. महायुती सरकारचे तत्कालीन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केरळच्या धर्तीवर हेच धोरण नव्याने जाहीर केले. क्रीडा संस्कृती विकसित होण्यासाठी युवा खेळांडूना शिकवणारे प्रशिक्षक तयार केले जातील, अशीही माहिती क्रीडा मंत्र्यांनी दिली होती.

क्रीडागुणांकडे दुर्लक्ष
तीन ते चार वर्षांपूर्वी क्रीडा संकुलाला मंजुरी मिळाली असून काही प्रमाणात संरक्षण भिंत व निवारा शेडचे काही प्रमाणात बांधकाम करण्यात आले. त्यानंतर हे काम आजपर्यंत बंदच आहे. त्यामुळे तालुक्यातील मुलांच्या कला व क्रीडागुणांना वाव मिळण्यास बाधा पोहचत आहे.

आंदोलनानंतर भिंतीचे काम
मनसेकडून या क्रीडांगणासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली, मात्र ढिम्म प्रशासन लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येते. मनसेने तहसीलदार कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाची दखल घेत काही प्रमाणात संरक्षक भिंतीचे काम करण्यात आले होते. त्यानंतर हे काम आजपर्यंत बंदच आहे.

ग्रामीण भागातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, मात्र वाडात तालुक्यातील मुलांसाठी लक्ष देण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नाही. आमदार दौलत दरोडा यांच्या पाठपुराव्याने आता पुन्हा दोन कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
- जयेश शेलार, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष

क्रीडांगणांसाठी आता दोन कोटी ३९ लाखांचा निधी मंजूर झाला असून त्याच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या निधीमध्ये विविध कामांसाठी प्रस्ताव आहे.
- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, वाडा

वाडा क्रीडांगणाचा नकाशा तयार करण्यात आला असून काम अंतिम टप्प्यात आहे. सपाटीकरण, बांधकाम, सांडपाणी व्यवस्था, जलपुरवठा, हाॅल आदी कामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर असून ही कामे लवकरात लवकर सुरू करण्यात येतील.
- भक्ती अंब्रे, तालुका क्रीडा अधिकारी, वाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com