२८ पोलिस पाटीलांकडे ६३ गावांचा पदभार
२८ पोलिस पाटलांकडे ६३ गावांचा पदभार
विक्रमगड तालुक्यात ३५ पदे रिक्त; कामाचा अतिरिक्त ताण
विक्रमगड, ता. ६ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यात पोलिस पाटलांची ३५ पदे रिक्त असून, गेल्या अनेक वर्षांपासून फक्त २८ पोलिस पाटील ६३ गावांचा पदभार सांभाळत आहेत. त्यामुळे एका पोलिस पाटलास दोन ते तीन गावांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस पाटलांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे.
विक्रमगड तालुक्यात प्रत्येक महसुली गावांनुसार, पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ६० ते ६३ गावांसाठी पोलिस पाटील पद नियुक्त केलेले आहे; मात्र विक्रमगड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून फक्त २८ पोलिस पाटील ६३ गावांचा संपूर्ण पदभार सांभाळत आहे. त्यामुळे एका पोलिस पाटलास दोन ते तीन गावांची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सध्या विक्रमगड पोलिस कार्यालयाकडून पोलिस पाटलांना विशिष्ट ड्रेसकोड दिलेला असून, त्या ड्रेसकोडमध्ये त्यांनी काम करावे, असे सांगण्यात आले आहे; मात्र तालुक्यात ३५ पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने दोन गावांची जबाबदारी स्विकारावी लागत आहे. तसेच शासन पोलिस पाटलांकडे दुर्लक्ष करत असून, त्यांना मिळणारा प्रवासभत्ता वेळेत मिळत नाही. त्यांच्या मानधनात योग्य अशी वाढ झालेली नाही व रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. शासनाने या मागण्या मान्य कराव्यात व रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी पोलिस पाटील संघटनेने केली आहे.
सरकारचे मागण्यांकडे दुर्लक्ष
शासन पोलिस पाटलांकडे दुर्लक्ष करत असून त्यांना मिळणारा प्रवासभत्ता वेळेत मिळत नाही. त्यांच्या मानधनात योग्य अशी वाढ झालेली नाही व रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. याबाबत पोलिस पाटील संघटनेने शासनाकडे पत्रव्यवहार केलेला असूनदेखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात व रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी पोलिस पाटील संघटनेने केली आहे. गाव- खेड्यांमध्ये होत असलेले वाद मिटविणे, दोन्ही गटांना समज देणे, त्यांच्यामध्ये सलोखा साधणे, पोलिसांना गावाची माहिती पुरविणे, विविध दाखले देणे, सरकारी कामे करून घेणे, गुन्ह्यांबाबत अधिकाऱ्यांना माहिती देणे, या कामांकरिता पोलिस पाटलांना तत्पर राहावे लागते. त्यातच शासनाने दिलेले मानधन खूप कमी असल्याने त्यामध्ये वाढ करावी, अशीही त्यांची मागणी आहे.
पोलिस पाटील नसलेली ३५ गावे
दादडे, गडदे, उपराळे, बालापूर, वेहेलपाडा, विठ्ठलनगर, चिंचघर, आलोंडे, बांधण, खांडेघर, डोल्हारी खु., केगवा, हातणे, मेढी, सोळशेत, अंधेरी, भानपूर, माण, उटावली, पोचाडे, वाकी, तलवाडा, खोस्ते, बास्ते, मोह खु., आपटी बु., खडकी, जांभा, शेवता, कशिवली, ओंदे, पोटखळ, साखरे, सजन, झडपोली आदी ३५ गावांना सद्यस्थितीत पोलिस पाटील नाहीत.
प्रतिक्रिया
पोलिस पाटलांना प्रवासभत्ता वेळेत दिला जात नाही. तसेच विक्रमगड तालुक्यात ३५ पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने एका पोलिस पाटलाला दोन-दोन महसुली गावांची अतिरिक्त जबाबदारी स्विकारावी लागत आहे आणि मानधनातदेखील योग्य अशी वाढ झालेली नाही.
- हरी कान्हु तारवी, पोलिस पाटील, सुकसाळे, तालुका सचिव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

