गुरुनानक जयंतीनिमित्त उल्हासनगरात भव्य प्रभातफेरी

गुरुनानक जयंतीनिमित्त उल्हासनगरात भव्य प्रभातफेरी

Published on

उल्हासनगर ‘वाहेगुरू’च्या जयघोषाने दुमदुमले!
गुरू नानक जयंतीनिमित्त उल्हासनगरात प्रभातफेरी
उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : पहाटेच्या मंद वाऱ्यात, ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘सतनाम वाहेगुरू’च्या अखंड जयघोषात उल्हासनगर शहर बुधवारी (ता. ६) भक्तिमय रंगात रंगले. गुरू नानक जयंतीनिमित्त थायरासिंह दरबारतर्फे प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे ५ वाजता थायरासिंह दरबार येथून निघालेली ही फेरी १७ सेक्शन, पालिका, चोपडा कोर्ट, गोल मैदान, नेहरू चौक, शिरू चौक, खेमाणी, पंजाबी कॉलनी चौक, फारवर्ड लाइनमार्गे शिवाजी चौक असा प्रवास करत पुन्हा दरबारात परतली. सुमारे पाच ते सहा तास चाललेल्या या प्रभातफेरीदरम्यान उल्हासनगर शहर ‘वाहेगुरू’च्या नामस्मरणाने दुमदुमून गेले. या सोहळ्याला पोलिस उपायुक्त सचिन गोरे, मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड, पोलिस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, उमेश सावंत, थायरासिंह दरबारचे प्रमुख जसकीरत यांच्यासह शहरातील मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते.

प्रभातफेरीवर फुलांचा वर्षाव
रंगीत पताका, सजविलेल्या वाहनांची शोभायात्रा, ढोलकींच्या तालावर नाचणारे युवक आणि स्त्रियांच्या ओव्या यामुळे वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले होते. गुरुबाणीचे सूर आणि कीर्तनाच्या लहरींनी शहरातील प्रत्येक गल्लीला भक्तीचा सुगंध लाभला. अनेक नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून फुलांचा वर्षाव करत प्रभातफेरीचे स्वागत केले, तर हेलीकॉप्टरच्या सहाय्याने या प्रभातफेरीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातील विविध गुरुद्वारांमध्ये गुरुपर्व श्रद्धा, आनंद आणि सामूहिक प्रार्थनांनी साजरा करण्यात आला.

श्रद्धेचा आणि सेवाभावाचा सुंदर संदेश
संपूर्ण उल्हासनगर प्रभातफेरीने एकात्मतेचा, श्रद्धेचा आणि सेवाभावाचा सुंदर संदेश दिला. शहरातील हा सोहळा एकतेचा आणि मानवतेचा संगम होता, याने उल्हासनगरच्या आकाशात भक्तीचा दीप उजळवला, अशी प्रतिक्रिया आयोजकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com