शहापुरातील रिक्षाचालकाची मुलगी झाली सीए
शहापुरातील रिक्षाचालकाची मुलगी बनली सीए
घरात साजरी झाली यशाची दिवाळी
शहापूर, ता. ६ (वार्ताहर) : घरची परिस्थिती बेताची, म्हणावे तसे शैक्षणिक वातावरणही नाही; पण कष्ट घेण्याची तयारी असेल, तर तुम्ही आकाशालाही गवसणी घालू शकता, हे शहापूरसारख्या छोट्या शहरात राहणाऱ्या साक्षी खरे हिने सिद्ध केले. जिद्द आणि चिकाटीवर ती सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याने रिक्षाचालक असलेल्या वडिलांची मेहनत सार्थक ठरल्याची अनुभूती घेत आहेत.
आपल्या पाल्याच्या पायाशी सुखाने लोळण घ्यावे, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. जगातील सर्व सुख देण्यासाठी आई-वडील मेहनत घेत असतात; पण प्रत्येक पालकाला हे शक्य होतेच असे नाही. साक्षीचे वडील सुरेंद्र खरे हे शहापूरमध्ये रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई राजश्री खरे या गृहिणी आहेत. साक्षीचं शालेय शिक्षण न्यू अर्चना इंग्लिश मीडियम स्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण सोनूभाऊ बसवंत कॉलेजमध्ये झाले. सुरुवातीला ती विज्ञान शाखेकडे वळण्याचा विचार करत होती. त्यानंतर कालांतराने तिने कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊन अथक मेहनतीने सीएची पदवी मिळवली. साक्षी सीए झाल्याचे कळताच शहापूरमधील घरांत पुन्हा एकदा दिवाळीच साजरी झाली. सीए होण्याचे स्वप्न तिने प्रत्यक्षात साकारले.
जिद्दीने घेतले शिक्षण
घरातील आर्थिक परिस्थिती कठीण होती. आई मनोधैर्य वाढवत होती, बाबा रिक्षा चालवत स्वप्नांना बळ देत होते, असे सांगताना साक्षी भावुक झाली. चार वर्षांची असताना साक्षीने ऐतिहासिक माहुली किल्ला सर केला होता. तेव्हाच तिच्यातील जिद्दीची झलक दिसली. आज तिच जिद्द तिला सीए बनवून गेली. कठोर परिश्रमाला पर्याय नसतो, असे सांगत साक्षीने सर्व मित्र, नातेवाईक आणि मार्गदर्शकांचे आभार मानले आहेत. साक्षीचे वडील सुरेंद्र खरे म्हणाले की, आम्ही फक्त पाठिंबा दिला. बाकी तिच्या मेहनतीचे फळ आहे. तिने ध्येय गाठलंय, आता पुढची वाट ती स्वतः घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयुष्याला मिळाले वळण
शहापूर येथे व्यवसायाने सीए असलेल्या प्रमोद जोशी यांची साक्षीने शिकवणी लावली होती. तिथेच तिला कॉमर्सची गोडी लागली. जोशी यांनी तिच्या अभ्यासातील गुण ओळखून साक्षीला तू सीए होऊ शकतेस, असा सल्ला दिला. तोच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

