अवकाळी पावसाचा दुहेरी फटका

अवकाळी पावसाचा दुहेरी फटका

Published on

ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले
धसई, टोकावडे, सरळगाव आठवडी बाजारपेठांतील उलाढाल घटली
टोकावडे, ता. ६ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेती आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्रही मंदावले आहे. धसई, टोकावडे, सरळगाव येथील आठवडा बाजार ओस पडल्याने उलाढाल घटल्याचे दिसून आले. यामुळे व्यापारी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दरवर्षी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी हे सण तालुक्यातील व्यापाऱ्यांचे सुवर्ण दिवस असतात. गावोगावी चाकरमानी घरी येतात आणि बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह असतो. कपडे, मिठाई, सजावटीचे साहित्य, फटाके आणि घरगुती वस्तूंना मोठी मागणी असते. मात्र, यंदा परतीच्या पावसाने बाजारपेठा ओस पडल्या आहेत. दिवाळीच्या आधीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे ग्राहकांनी घराबाहेर पडणे टाळले. तर, शेतकरी वर्ग पावसाच्या चिंतेत गुंतला आहे. सध्या शेतकरी भातकापणीच्या कामात व्यस्त असून, पावसामुळे भाताचे उत्पादन घटेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी खरेदीसाठी बाजारात कमी प्रमाणात येत आहेत. याचा व्यापारावर थेट परिणाम झाला आहे.

व्यापारात ७० ते ८० टक्क्यांनी घट
सरळगाव, धसई आणि टोकावडे, मुरबाड या प्रमुख आठवडा बाजारपेठांमध्ये सणासुदीच्या काळात मोठी उलाढाल होते, परंतु यंदा पावसामुळे व्यापार जवळपास ७० ते ८० टक्क्यांनी घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दुकानात माल आहे, पण ग्राहक नाहीत. यामुळे खर्च भागवणे अवघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे. महागाई आणि पावसाच्या दुहेरी संकटामुळे ग्राहकांनी खर्चावर मर्यादा आणल्याचे व्यापारी सांगतात.

नजर उन्हाळी हंगामावर
आता व्यापाऱ्यांची नजर उन्हाळी हंगामावर लागली आहे. शेतीमाल विक्री आणि विवाह सोहळ्यांचा हंगाम सुरू झाल्यास पुन्हा बाजारात चैतन्य परत येईल, अशी अपेक्षा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com