तळा तालुक्यात बेरोजगारीची भीषण छाया
तळा तालुक्यात बेरोजगारीची भीषण छाया
गावोगावी स्थलांतराची लाट; ७५ टक्के घरे ओस
तळा, ता. ११ (बातमीदार) : तळा तालुक्यात वाढत्या बेरोजगारीमुळे नागरिकांचे आयुष्य विस्कळित झाले असून, रोजगाराच्या शोधात युवावर्ग परगावी गेल्याने लोकसंख्यादेखील घटत चालली आहे. जवळपास ७५ टक्के घरे ओस पडलेली दिसून येतात. अनेक गावे तर अक्षरशः रिकामी झाली आहेत. तालुका निर्मितीला तब्बल २५ वर्षे झाली असली तरी रोजगार निर्मितीच्या दिशेने ठोस पावले न उचलल्याने लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
शिक्षण घेऊन तयार झालेली तरुण पिढी मोठ्या अपेक्षेने गावात रोजगार मिळेल, उद्योग सुरू होतील या आशेने वाट पाहीत राहिली; परंतु परिस्थितीत बदल झालेला नाही. परिणामी अनेकांनी मुंबई, ठाणे, नालासोपारा, दिवा अशा भागांत जाऊन लहान-मोठ्या नोकऱ्या स्वीकारल्या. अनेकांनी आपल्या मालकीच्या जागा-जमिनी कवडीमोल दरात विकून शहरात छोटे घर घेतले. गावात रोजगार नसल्याने आणि विकासाचे वारे न लागल्याने हे स्थलांतर अनिवार्य झाले आहे. मुंबई–दिल्ली कॉरिडॉरसारख्या प्रकल्पांनी आशेचा किरण दाखवला होता, मात्र अद्याप प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. सद्य:स्थितीत तळा तालुक्याचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोजगाराचा अभाव हा आहे. हाताला काम नाही, शेतीवर उत्पन्न नाही, उद्योग नाही, त्यामुळे लोक गाव सोडणे भाग पडत आहे. सामाजिकदृष्ट्या ओसाड झालेल्या गावांकडे पाहून हीच का प्रगती, असा प्रश्न सामान्य नागरिक राजकीय नेत्यांना संबोधून उपस्थित करीत आहेत.
.........
राजकीय भूलथापा
स्थानिक राजकीय आणि आर्थिक शक्ती असलेल्या मोजक्या लोकांच्या हाती जमिनी गेल्या, तर सामान्य जनतेचे स्वप्न चुरगळले गेले. प्रत्येक निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष मोठमोठ्या आश्वासनांचा पाऊस पाडतात. पर्यटन विकास करू, बिगर रासायनिक उद्योग आणू, नवीन गुंतवणूक येईल, अशा घोषणा करून मतदारांना गंडवतात. प्रत्यक्षात मात्र रोजगार निर्मितीचा एकही प्रकल्प उभा राहत नाही. निवडणूक संपली की नेते गायब होतात आणि रोजगाराचा प्रश्न तसाच राहतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

