देऊळवाडीतील त्रिपुरारी यात्रेला भक्तांचा प्रतिसाद

देऊळवाडीतील त्रिपुरारी यात्रेला भक्तांचा प्रतिसाद

Published on

देऊळवाडीतील त्रिपुरारी यात्रेला भक्तांचा प्रतिसाद
अकराव्या शतकातील प्राचीन भैरवनाथ देवस्थानात भक्तिमय वातावरण
कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील देऊळवाडी येथे पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने भैरवनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. अकराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले हे प्राचीन भैरवनाथ देवस्थान भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असून, यात्रेदरम्यान परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यात्रेची नेमकी सुरुवात केव्हा झाली याची अधिकृत नोंद उपलब्ध नसली तरी पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली परंपरा आजही जोपासली जाते. ढाक येथील काळभैरवांची पूजा करून ढोल-काठी आणण्याची प्रथा ही यात्रेतील मुख्य आकर्षण ठरते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ही काठी मंदिरासमोर उभी केली जाते. यंदाही सकाळी महाकाकडा पार पडल्यानंतर दुपारी भजन-कीर्तनांनी वातावरण दुमदुमले. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेची सांगता तिसऱ्या दिवशी भंडाऱ्याने होते. या वेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. स्थानिकांमध्ये अशीही आख्यायिका प्रचलित आहे की, पूर्वी देव पांढऱ्या घोड्यावर बसून चारही गावांत परिभ्रमण करीत असे. त्यामुळे हे देवस्थान अत्यंत जागृत असल्याची श्रद्धा आजही टिकून आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दर्शनासाठी येत असून, रात्रीच्या जत्रेमध्ये पाय ठेवायलादेखील जागा उरत नाही, असे स्थानिक दिलीप बडेकर यांनी सांगितले. देऊळवाडीची त्रिपुरारी यात्रा हा कर्जत तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अभिमान असून, यंदाही भक्ती, परंपरा आणि उत्साहाने या यात्रेचा सोहळा रंगात आला आहे.
............
अनेकांचे दैवत
देऊळवाडीतील भैरवनाथ मंदिर हे भारतातील असे एकमेव ठिकाण आहे, जिथे शिव आणि भैरवाची एकत्र पूजा केली जाते. या मंदिराला ‘अष्टभैरवां’पैकी मूळ स्थान मानले जाते. कर्जत तालुक्यातील हालीवली, मुद्रे, वांजळे, आषाने, उकरूळ, तिवणे आणि ढाकभैरव या अष्टभैरवांमध्ये देऊळवाडीचे महत्त्व सर्वाधिक आहे. स्थानिकांसह देऊळवाडी, किरवली, बोरवाडी आणि पुलाचीवाडी या चार गावांचे हे ग्रामदैवत तसेच अनेकांचे कुलदैवत असल्याने येथे भाविकांची सतत वर्दळ असते. २०२२ रोजी मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने संपूर्ण परिसर अधिक आकर्षक व सोयीस्कर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com