अंबरनाथ शहर अंधारात!

अंबरनाथ शहर अंधारात!

Published on

अंबरनाथ शहर अंधारात!
पथदिव्यांच्या वादाची नागरिकांना झळ
अंबरनाथ, ता. ६ (वार्ताहर) : शहरात रात्रीचा अंधार जणू कायमचाच झाला आहे. नगरपालिका आणि पथदिव्यांचे देखभाल काम करणाऱ्या कंत्राटदार संस्थेचा वाद चिघळल्याने शहरातील जवळपास ५० टक्के रस्ते अंधारात बुडाले आहेत. परिणामी, नागरिकांना रात्रीच्या वेळी अपघात, चोरी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथ नगरपालिकेने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम एका कंपनीला दिले होते, मात्र कंत्राटदाराला पालिकेकडून देय असलेली रक्कम न आल्याने दुरुस्ती आणि देखभाल पूर्णपणे ठप्प झाली आहे. आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी झाली असून, बंद दिवे दुरुस्त करण्याचे काम रखडले आहे. परिणामी, शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि अंतर्गत गल्ल्या काळोखात झाकल्या गेल्या आहेत. यामुळे नागरिकांना रात्री घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे. दिवे बंद असल्याने चेन स्नॅचिंग, अपघात आणि महिलांची छेडछाड याशिवाय सरपटणारे प्राणी यांसारख्या घटनांत वाढ झाली आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी अनेकदा केली. काही भागात सलग आठवडाभर दिवे बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
बंद पथदिव्यांच्या प्रश्नावरून यापूर्वीही राजकीय पक्षांकडून आंदोलनं करण्यात आली होती, मात्र परिस्थितीत सुधारणा झाली नाही. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असून, पथदिव्यांचा वाद संपवून शहर पुन्हा उजळावे, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यातील वादामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

दंडात्मक कारवाईचा इशारा
या वेळी नगरपालिकेच्या विद्युत विभागाने स्पष्ट केले की, दुरुस्तीचे काम अत्यंत संथ आणि बेजबाबदारपणे सुरू आहे. हेल्पलाईन नंबर बंद असून, नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद मिळत नाही. अनेक नोटिसा बजावल्यानंतरही कामाच्या गतीत सुधारणा झालेली नाही. प्रशासनाने कंत्राटदाराला साहित्य साठा वाढवणे, मनुष्यबळ वाढवणे आणि दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

न्यायालयीन मार्ग अवलंबला
तर कंत्राटदाराने आपली बाजू मांडताना सांगितले की, नगरपालिकेकडून देयके वेळेवर मिळाली नाहीत. कोविडनंतर वाढलेली पथदिव्यांची संख्या, देखभालीचा अतिरिक्त खर्च आणि प्रशासनाकडून तांत्रिक सहकार्य न मिळाल्याने अडचणी वाढल्या. या सर्व मुद्द्यांवरून त्यांनी न्यायालयीन मार्ग अवलंबल्याचे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com