आंदोलनातील आरोग्याचा ‘जीटी मॉडेल’

आंदोलनातील आरोग्याचा ‘जीटी मॉडेल’

Published on

आंदोलनातील आरोग्याचे ‘जीटी मॉडेल’
भविष्यातील आरोग्य आपत्ती व्यवस्थापनासाठी धडा
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ऑगस्ट महिन्यात झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान आजारी पडलेले आंदोलनकर्ते आझाद मैदानाला लागून असलेल्या जी. टी. रुग्णालयात दाखल झाले होते. उपचारादरम्यान जी. टी. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करून तो प्रकाशित केला आहे. या अभ्यासातून भविष्यात अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये आरोग्याच्या कोणत्या सुविधा ठेवणे आवश्यक आहे, याची शिफारसही करण्यात आली आहे.
२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान एकूण जी. टी. रुग्णालयात आलेल्या २४९ रुग्णांपैकी २२४ जणांवर ओपीडीत उपचार केले, तर २५ जणांना दाखल करण्यात आले होते. सर्वाधिक आढळलेल्या आजारांमध्ये तीव्र ताप, अंगदुखी, थकवा आणि दुखापतींचा समावेश होता.
तीव्र ज्वरसदृश आजार ५४ टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये नोंदवले गेले, तर २२.८ टक्के प्रकरणे अंगदुखीची, १३.४ टक्के दुखापतींची आणि ९.४ टक्के थकव्याची होती. बहुतांश रुग्णांवर आयव्ही फ्लुइड, वेदनाशामक आणि प्रतिजैविक औषधांनी उपचार करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णांपैकी तब्बल ६८ टक्के रुग्णांनी उपचार पूर्ण होण्यापूर्वीच रुग्णालय सोडले. जी. टी. रुग्णालयाने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
या अभ्यासात जी. टी. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जितेंद्र सकपाळ, डॉ. सुश्रुत सकपाळ, डॉ. सलमान मलिक, डॉ. रामकिशोर एम., डॉ. सारंग केळकर आणि डॉ. व्यंकटेश देशपांडे सहभागी होते.

बीड, परभणीहून सर्वाधिक रुग्ण
डॉ. सकपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल रुग्ण महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांतील होते. त्यात बीड जिल्ह्याचे ३७.७ टक्के, परभणीचे २२.१ टक्के, जालना ७.६ टक्के आणि नांदेडचे ६.८ टक्के रुग्ण होते. हे सर्व रुग्ण प्रामुख्याने युवक आणि मध्यमवयीन होते. दीर्घ प्रवास, गर्दी आणि अस्वच्छ वातावरणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला.

व्हायरल आणि निर्जलीकरणामुळे वाढला त्रास
मोर्चादरम्यान आझाद मैदानात खुल्या आकाशाखाली थांबणे, अस्वच्छ पाणी आणि अन्न सुरक्षेचा अभाव यामुळे आजार पसरले. सुमारे २,३०० जणांना व्हायरल ताप, घशाचे संक्रमण आणि निर्जलीकरणाची लक्षणे आढळली. जी. टी., जे. जे. आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयांना सतर्क ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या पद्धतीमुळे तातडीची वर्गवारी (ट्रायएज) आणि उपचार प्रक्रिया अधिक वेगवान झाली. रुग्णालय प्रशासनाने ही कार्यपद्धती शहरी आरोग्य आपत्ती व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल ठरू शकते, असे सांगितले.

अभ्यासातील प्रमुख नोंदी
- धार्मिक किंवा राजकीय मोठ्या गर्दीच्या चळवळी संसर्गजन्य आजार आणि दुखापतींचे केंद्रबिंदू ठरू शकतात.
- कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यांप्रमाणे राजकीय आंदोलनांमध्येही आरोग्यविषयक धोक्यांचा संभव
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने राजकीय आंदोलनांसाठी धार्मिक मेळ्यांप्रमाणे आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत.

शिफारशी
- आंदोलनांदरम्यान मोबाइल हेल्थ युनिट, सिंड्रोमिक मॉनिटरिंग प्रणाली आणि आपत्कालीन औषधसाठा उपलब्ध ठेवावा.
- स्वच्छ पाणी, सुरक्षित अन्न आणि रात्री थांबण्याची स्वच्छ व सुरक्षित व्यवस्था सुनिश्चित करावी.
- मोठ्या आंदोलनांसाठी आरोग्य व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com