डहाणू नगरपरिषदेची निवडणूक रंगणार

डहाणू नगरपरिषदेची निवडणूक रंगणार

Published on

डहाणू नगर परिषदेत ताकद पणाला
स्थानिक पातळीवर चुरस वाढली
सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ६ ः जिल्ह्यातील जुनी नगर परिषद म्हणून ओळख असलेल्या डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे डहाणूतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागात जोरदार राजकीय हालचाली सुरू असून प्रचारासाठी पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

डहाणू नगर परिषद हद्दीत राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून दोन्हीही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच स्थानिक आघाड्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत. या पक्षांसह इतर स्थानिक गटांनी प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे. काही ठिकाणी पक्षांतरांची शक्यताही व्यक्त केली जात आहे. युवा मतदार आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या वाढल्याने येथे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

प्रमुख पक्षाचे माजी नगरसेवक यांना तिकीट मिळेल, अशी दाट शक्यता त्यांनी आधीच मनाशी ठेवली आहे. त्यातच उमेदवारांच्या तिकीट वाटपावरून अंतर्गत संघर्षाची चिन्हेही दिसत आहेत. स्थानिक मुद्द्यांवरून ही निवडणूक चुरशीची आणि रंगतदार बनणार आहे. गेल्या काही दिवसांपासून डहाणूत राजकीय बैठका, प्रचारफेऱ्या आणि जनसंपर्क मोहिमांना वेग आला आहे.

मागील निवडणुकीत डहाणू नगर परिषदेत भाजपचे नगराध्यक्ष होते. भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा हा गड असल्याने ही निवडणूक ताकदीने लढवून नगर परिषद भाजपकडे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे; मात्र नगर परिषदेमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले वर्चस्व असल्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. तर शिंदे गटाचा या नगर परिषदेत फारसा प्रभाव नसला तरी त्यांनी निवडणुकीची तयारी आणि तसे प्रयत्न सुरू केले आहेत. नगर परिषदेत २०१९ मध्ये एकूण २३ जागा होत्या. आता जाहीर झालेल्या निवडणुकीमध्ये या नगर परिषदेत २७ जागा आणि १३ प्रभाग झालेले आहेत. तब्बल चार सदस्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भाजपसोबत ठाकरे गट आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांमध्ये खरी लढत असणार आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस खऱ्या अर्थाने आपली ताकद पणाला लावणार आहेत. त्यासोबत ठाकरे गट, शिवसेना, अजित पवार गट आपले उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उतरवण्याच्या तयारीत आहेत आणि त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे.


स्थानिक प्रश्न ठरणार निर्णायक
पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन आणि किनारपट्टी विकास असे निवडणुकीचे प्रमुख विषय ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक आदिवासी व मच्छीमार समाजाचा निर्णायक प्रभाव या निवडणुकीत दिसणार आहे. या निवडणुकीत डहाणूतील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुर्दशा, किनारपट्टी विकास, तसेच मच्छीमार आणि आदिवासी समाजाच्या समस्या हे प्रमुख मुद्दे ठरण्याची शक्यता आहे. स्थानिक जनतेचा कल विकासकामे व सुविधा यांकडे झुकलेला असून भावनिक मुद्द्यांपेक्षा कामगिरीवर मतदारांचा भर दिसत आहे.

सध्याची आव्हाने
डहाणू नगर परिषद हद्दीत आता जनगणनेच्या तुलनेत कैक पटीने लोकसंख्या वाढली आहे. शहरामध्ये एक ते दीड लाखापेक्षा जास्त लोकसंख्या वसलेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी अतिक्रमण वाढती लोकसंख्या किनारपट्टी संरक्षण मागासवर्गीयांचे कल्याण स्वच्छ शहर अशी अनेक आव्हाने अजूनही आहेत.

नवे चेहरे, नव्या आघाड्या
मागील निवडणुकीत पक्षांमध्ये जवळजवळ समसमान चुरस झाली होती. या वेळी मात्र नवे चेहरे आणि नव्या आघाड्यांमुळे स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. तीन दशकांहून अधिक काळाच्या प्रवासात डहाणू नगर परिषद एका लहानशा किनारी गावातून एक प्रगतिशील आणि स्वावलंबी शहरात रूपांतरित झाली आहे. आता हीच प्रगती टिकवून ठेवणे आणि भावी पिढीसाठी स्वच्छ, आधुनिक डहाणू निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट राजकीय पक्षांचे असावे, असे जनमत पुढे येत आहे.

डहाणू नगर परिषद २७ जागा
पक्ष - २०१९ - आताची स्थिती
भाजप - १३ - १३
शिवसेना - २ - ०
उबाठा - ० - २
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - ८ - ७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com