एपीएमसीअंतर्गत रस्‍त्‍यांच्या दुरस्‍तीला वेग

एपीएमसीअंतर्गत रस्‍त्‍यांच्या दुरस्‍तीला वेग

Published on

एपीएमसीअंतर्गत रस्‍त्‍यांच्या दुरस्‍तीला वेग
धान्य बाजारातील काम प्रगतिपथावर; व्यापाऱ्यांसह ग्राहकांना दिलासा
जुईनगर, ता. ६ (बातमीदार) ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य व मसाला बाजारातील रस्त्यांची डागडुजी अखेर वेगाने सुरू झाल्याने व्यापारी, वाहनचालक आणि माथाडी कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक दिवसांपासून रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या चर्चेला अखेर यश आले असून, बाजार परिसरातील नागरी समस्या कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.
राज्यभर यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली मुंबई कृषी उत्पन्न समितीच्या पाचही मार्केटमधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. धान्य व मसाला मार्केटमधील गटारे तुंबल्याने साचलेले पाणी आणि खड्डे यामुळे बाजार परिसर पाण्याखाली जात होता. व्यापाऱ्यांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर आकारला जात असूनही सुविधा मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात होती. ग्राहक, व्यापारी, माथाडी कामगार, मापाडी आणि कर्मचारी यांच्या मोठ्या प्रमाणातील वर्दळीमुळे या परिसरात दुचाकींपासून ते बाराचाकी वाहनांपर्यंत सतत हालचाल असते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. शिवाय वारंवार छोटे-मोठे अपघातही होतात. वाहनचालकांना रस्त्यांवरून मार्ग काढताना कसरत करावी लागते. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनाही वाहनांच्या देखभालीवर आणि दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागतो. माथाडी कामगारांना ५० किलो वजनाच्या गोण्या डोक्यावरून उचलून निसरड्या पाणथळ जागेतून चालावे लागत असल्याने त्यांचा अपघात होत होता. त्‍यामुळे येथील अंतर्गत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती करण्यात यावी, अशी मागणी व्यापारीवर्गाकडून वारंवार बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाकडे करण्यात येत होती, मात्र एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात होती. अखेर तीव्र विरोध झाल्याने एपीएमसी प्रशासनाने रस्‍ते दुरुस्‍तीचे काम हाती घेतल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
..................
२५ कोटी रुपये खर्च
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात धान्य व मसाला मार्केटमध्ये रस्ते डांबरीकरणावर तब्बल २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यापैकी २०२० रोजी नऊ कोटी, २०२३ मध्ये पाच कोटी, तर इतर डागडुजीवर एक कोटी रुपये खर्च झाला. तरीही पावसाळा सुरू होताच खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, मात्र सध्या सुरू असलेली रस्ते दुरुस्ती तात्पुरती असली तरी बाजारातील व्यापारी आणि वाहतूकदारांसाठी ती दिलासादायक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com