बदलापूर अंबरनाथमध्ये कठोर निर्बंध लागू
बदलापूर, अंबरनाथमध्ये कठोर निर्बंध लागू
आक्षेपार्ह पोस्टरबाजी करणे, हत्यारे बाळगण्यावर बंदी; राजकीय पक्षांना पोलिसांकडून तंबी!
मोहिनी जाधव
बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : बदलापूर-अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडाव्यात, यासाठी ठाणे शहर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाजमाध्यमे आणि शहरभर आक्षेपार्ह पोस्टरबाजी, होर्डिंग, झेंडे लावण्यावर तसेच हत्यारे बाळगण्यावर थेट बंदी आणली आहे. त्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त कार्यालयातून आखणी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, मतदान आणि मतमोजणी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष आदेश जारी केले आहेत.
बदलापूर आणि अंबरनाथ दोन्ही शहरांतील नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम असणार आहे. दोन्ही शहरांत भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष या सगळ्यांची ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील नगरपालिकेच्या निवडणुकांवर राज्याचे लक्ष लागून आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील निवडणुका शांतता व सुव्यवस्थेत पार पाडाव्यात, यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस निर्णय घेतले आहेत. ठाणे शहर पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) मीना मकवाना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३चे कलम १३६ व १३८ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ३३ (१)(ब) आणि ३७ (१) (३) अन्वये हा आदेश देण्यात आला आहे. निवडणूक काळात शहरात अनुशासन, सुरक्षा आणि शांतता राखण्याच्या उद्देशाने लागू केलेला आदेश ६ नोव्हेंबरपासून लागू होणार असून, ३ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.
शस्त्र बाळगण्यासह मोर्चे व सभांना बंदी
आदेशानुसार निवडणुकीदरम्यान कोणालाही शस्त्र, दंडुका, तलवार, चाकू, बंदूक, स्फोटक वस्तू किंवा जीवघेणे शस्त्र बाळगण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी जाहीर सभा, मोर्चे, निदर्शने, फटाके फोडणे, डीजे वा बॅंड वाजवणे, घोषणाबाजी तसेच निवडणूक प्रचाराच्या नावाखाली वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासही सक्त मनाई असेल.
ध्वनिप्रदूषणावर निर्बंध
निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर, फलक, झेंडे लावणे किंवा लाऊडस्पीकरचा वापर करणे यास मनाई करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले असून, उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील.
मतदान काळात मद्यविक्रीवर बंदी
मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी शहरात मद्यविक्री तसेच मद्यसेवनास संपूर्ण बंदी राहील. संबंधित दारू दुकाने, बार, मद्यालयांना यासंबंधी कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिस बंदोबस्त
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ-४अंतर्गत बदलापूर व अंबरनाथ परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. बदलापूर पूर्व पश्चिम पोलिस स्टेशन व अंबरनाथ पूर्व, पश्चिम तसेच कुळगाव परिसरात अतिरिक्त पोलिस पथके, महिला पोलिस, गुप्तवार्ता यंत्रणा आणि पेट्रोलिंग पथकांकडून सतत गस्त ठेवली जाईल. तसेच निवडणूक काळात संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही निरीक्षण आणि तात्पुरती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
कडक कारवाई
पोलिस उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे, की निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी, प्रचार मोर्चांमुळे गोंधळ निर्माण करणारी किंवा सामाजिक सौहार्द बिघडवणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही. अशा व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच पोलिस अधिनियमांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

