शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपतर्फे नाईकांची वर्णी

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपतर्फे नाईकांची वर्णी

Published on

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपतर्फे नाईकांची वर्णी
महापालिका निवडणुकीत ठाणे, नवी मुंबईची नाईकांकडे जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : वनमंत्री गणेश नाईक यांची भाजपतर्फे निवडणूक प्रभारी म्हणून ठाणे जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान असल्याचे मानले जात आहे. तर नवी मुंबई महापालिकेचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे भाजपने थेट शिंदेंविरोधात रणशिंग फुंकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांमध्ये एकमेकांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमधील संबंध ताणले गेले आहेत. नाईकांकडून शिंदेंना डिवचण्याची एकही संधी सोडली जात नाही. तर त्यांच्या वक्तव्याला वेळोवेळी शिंदे गटाच्या नेत्यांकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. अशा परिस्थितीत नाईकांनी आपल्याला संधी मिळाल्यास ठाण्यात भाजपचा महापौर बसवून दाखवेन, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात नाईकांची प्रभारी म्हणून नियुक्ती करून भाजपतर्फे नाईकांना थेट पाठबळ मिळाल्याची चर्चा रंगली आहे. नाईकांकडे ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांची जबाबदारी आहे. तर त्यांचे पुत्र संजीव नाईक यांना महापालिका निवडणूक प्रमुख केले आहे. गणेश नाईकांचे आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत संजीव नाईक यांना प्रमुख करून महापालिका निवडणुकीची दोरी नाईकांच्या हाती दिली आहे. त्यामुळे विधानसभेत मंदा म्हात्रेंविरोधात काम करणाऱ्या आणि आता भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांंना पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोणालाही कुठेही जबाबदारी दिली तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. आम्ही पुढील सूचना येईपर्यंत महायुतीचे काम करीत राहणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे, असे शिवसेने शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सांगितले.
------
रणनीतीकडे लक्ष
एकमेकांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमधील संबंध ताणले गेले आहेत. नाईकांकडून शिंदेंना डिवचण्याची एकही संधी सोडली जात नाही. तर त्यांच्या वक्तव्याला वेळोवेळी शिंदे गटाच्या नेत्यांकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. अशा परिस्थितीत नाईकांनी आपल्याला संधी मिळाल्यास ठाण्यात भाजपचा महापौर बसवून दाखवेन, असे वक्तव्य केले होते. आपले वक्तव्य खरं करण्यासाठी गणेश नाईक कोणती रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
....

........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com