माथेरान ट्रेन

माथेरान ट्रेन

Published on

माथेरानच्या मिनी ट्रेनची पुन्हा धाव
पर्यटकांसह व्यावसायिकांमध्ये उत्साह

कर्जत, ता. ६ (बातमीदार) ः माथेरानमधील डोंगररांगांमधून, दऱ्याखोऱ्यांमधून धावणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन हे या पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण आहे. विशेषतः शनिवार-रविवार आणि सलग सुट्ट्यांमध्ये या गाडीला प्रचंड गर्दी असते. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत ही सेवा सुरू केली जाते. यंदा पावसाची तीव्रता अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने ट्रॅकवरील दुरुस्तीचे काम लांबले. परिणामी, मिनी ट्रेनची धाव उशिरा सुरू झाली.
सर्व कामे मार्गी लावल्यानंतर गुरुवारी (ता. ६) सकाळी ८.५० वाजता पहिली मिनी ट्रेन नेरळ स्थानकातून मोठ्या जल्लोषात माथेरानकडे रवाना झाली. स्टेशन प्रबंधक गुरुनाथ पाटील आणि उपस्टेशन प्रबंधक धीरेंद्र सिंह यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर सकाळी १०.२५ वाजता दुसरी मिनी ट्रेनही माथेरानमध्ये दाखल झाली.
सुरक्षेच्या कारणास्तव जून ते ऑक्टोबर या पावसाळी काळात मुख्य मार्गावरील सेवा बंद ठेवावी लागते. या काळात केवळ अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवा सुरू असते; मात्र आता पुन्हा एकदा नेरळ-माथेरान ही संपूर्ण मिनी ट्रेन रेल्वे पर्यटकांच्या सेवेत दाखल झाल्याने मुंबई-पुण्यासह राज्यभरातील पर्यटकांची पावले पुन्हा माथेरानकडे वळू लागली आहेत.
----
गाडीच्या फेऱ्या
नेरळहून सकाळी सुटणाऱ्या दोन्ही गाड्या अनुक्रमे ११.३० वाजता आणि १.०५ वाजता माथेरान येथे पोहोचतील. तर दुपारी व संध्याकाळी माथेरानहून सुटलेल्या गाड्या संध्याकाळी ५.३० आणि ६.४० वाजेपर्यंत नेरळ येथे पोहोचतील. पूर्ण क्षमतेने गाड्या धावू लागल्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा उत्साह दुपटीने वाढला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com