नगराध्यक्षपदासाठी गृहलक्ष्मी मैदानात
नगराध्यक्षपदासाठी गृहलक्ष्मी मैदानात
दिग्गज नेत्यांच्या पत्नी, सुनांना संधी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ ः अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. थेट जनतेतून ही निवड होणार आहे. असे असले तरी या निवडणुकीसाठी स्थानिक दिग्गज नेते आपली गृहलक्ष्मी मैदानात उतरवणार आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. कुणी आपल्या पत्नीचे नाव पुढे केले आहे, तर कुणी सुनेचे. इतकेच नव्हे तर द्वि आणि त्री सदस्य पद्धतीने होणाऱ्या पॅनेलमध्येही अनेक ठिकाणी एकत्र पती-पत्नी रिंगणात उतरणार आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अ वर्ग नगर परिषदा असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदांसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तब्बल १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होणार असल्याने या दोन्ही ठिकाणी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या वेळीही पहिल्यांदाच पॅनेल पद्धतीने या दोन्ही नगर परिषदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तर २०१५ प्रमाणे जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे; मात्र त्यापूर्वीच नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने या सोडतीने प्रमुख मोठ्या नेत्यांच्या, ज्येष्ठ माजी नगरसेवकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. आणखी पाच वर्षे त्यांना या संधीची वाट पाहावी लागणार असल्याने नगराध्यक्षपद घरीच राहावे, यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. येथील प्रमुख स्थानिक नेत्यांनी नगराध्यक्षच्या आरक्षित पदासाठी आपल्या घरच्या महिलांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्त सुरू केले आहेत. दोन्ही शहरांमध्ये कुणाची पत्नी तर कुणाची सून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
अंबरनाथमध्ये पत्नी विरुद्ध सून
अंबरनाथ नगर परिषदेसाठी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद वाळेकर यांच्या पत्नी मनीषा वाळेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी याआधीही अडीच वर्षे नगरध्यक्षद भूषवले असल्याने त्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तीन वेळा नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या असून अंबरनाथसाठी हा ओळखीचा चेहरा आहे. तर भाजपकडून माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांच्या नावावर स्थानिक पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसकडूनही माजी नगरसेवक आणि ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे. इतर पक्षांच्या प्रस्थापित नेत्याच्या पत्नी, माजी नगरसेविकांकडेच ही उमेदवारी जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महायुतीत मिठाचा खडा
अंबरनाथ नगर परिषदेसाठी महायुती होणार की नाही यावर वरिष्ठ पातळीवर कोणतीच चर्चा झालेली नसताना भाजपने आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष उफाळून आला आहे. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी यावर संताप व्यक्त करून युती धर्म न पाळणाऱ्या भाजपला फैलावर घेतले; मात्र भाजपने त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसते.
बदलापुरात चुरस वाढणार
कुळगाव बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेच्या वतीने यापूर्वीच माजी नगराध्यक्षांच्या पत्नी तसेच माजी नगरसेविका वीणा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका रूचिता घोरपडे यांचे नाव चर्चेत आहे. माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या पत्नी रती पातकरही इच्छुक असल्याचे कळते आहे. महाविकास आघाडीने अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी चर्चेतील नावांमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पत्नीचेच नाव पुढे येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची बाजी
नगराध्यक्षपदासाठी बदलापूरमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. असे असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपली सुरक्षित खेळी येथे खेळली आहे. भाजपसोबत युती करून आपले उपनगराध्यक्षपद राखीव केले असल्याची चर्चा आहे. यामध्ये प्रामुख्याने कॅ. आशीष दामले यांच्या पत्नी यांचे नाव आघाडीवर आहे.
गृहलक्ष्मीचाच आग्रह का?
१ राजकीय वारसा कायम राहावा तसेच घरीच पद यावे
२ पत्नी, सून किंवा ताई, माई, अक्काच्या नावाने राजकारणात सक्रिय सहभाग
३ दिग्गज नेत्यांच्या घरच्या महिलांना संधी दिल्यास निवडणुकीत रंगत तसेच निवडून येण्याची हमी
महिला कार्यकर्त्यांचा हिरमोड
अनेक वर्षे पक्षात काम करूनही आणि योग्यता असूनही संधी मिळत नसल्याने महिला कार्यकर्ते, माजी नगरसेविकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या पदासाठी दोन्ही शहरांतून सुशिक्षित चेहरा अपक्ष म्हणून उतरण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

