ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक
ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची दीड कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार २०१२ ते मे २०२४ दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पोखरण रोड नंबर दोन येथे राहणारे प्रवीण खुराणा (वय ४४) यांचा शितल परिवहन नावाचा ट्रान्सपोर्टचा अधिकृत व्यवसाय असून त्याचे कार्यालय कापूरबावडी परिसरात आहे. या कंपनीकडे एकूण ६५० ट्रक आणि टेम्पो कार्यरत आहेत. कंपनीमध्ये आर्थिक पैशांचा घोटाळा व रोख रकमेचा अपहार झाल्याची शंका येताच सीए व इतर विश्वासू कर्मचाऱ्यांनी एकत्र बसून सखोल चौकशी केली. त्यानुसार सर्व व्हाउचर, पगार बिल व इतर कागदपत्रांची तपासणी केली असता या तपासणीत राजेंद्र मिश्रा (ऑपरेशन मॅनेजर), धीरेंद्र मिश्रा (गुड्स लोडिंग इन्चार्ज), शुभम दुबे, पंकज पांडे आणि दिनेश कुमार जाखर या पाच जणांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी हा प्रकार ५ एप्रिल २०२१ ते ३० डिसेंबर २०२४ दरम्यान केला.
राजेंद्र आणि धीरेंद्र मिश्रा यांनी शुभम, पंकज, दिनेश कुमार यांच्या मदतीने एअरपोर्ट येथील ट्रक पार्किंगच्या बनावट कॅश व्हाउचर तयार करुन कंपनीचे एकूण एक कोटी २० लाख रकमेचा अपहार केला आहे. याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे
आजाराचा गैरफायदा
याआधीही राजेंद्र आणि धिरेंद्र मिश्रा यांनी कंपनीत आर्थिक घोटाळा केला होता. प्रवीण खुराणा यांचे वडील मध्यंतरी फुफ्फुसाचा गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्या बापलेकांचे व्यवसायावर विशेष लक्ष नव्हते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत राजेंद्र मिश्रा यांनी चालकांचे वेतन अतिरिक्त पगार करून ३५ लाख ७१ हजार २६५ रुपये कंपनीकडून स्वतः व नातेवाईकांच्या बँक खात्यात ऑनलाईन व यूपीआयडीद्वारे वळते केले. त्याप्रकरणी ७ मे २०२४ मध्ये राजेंद्र आणि धीरेंद्र या दोघांविरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात ते सध्या जामीनावर बाहेर आहेत.

