मुरबाड रेल्वे प्रकल्पावर आरोप-प्रत्यारोप
सरळगाव, ता. ८ (बातमीदार) : मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडल्याचा ठपका माझ्यावर ठेवणारे खासदार सुरेश म्हात्रे हे अपुऱ्या माहितीतून बोलतात, असा पलटवार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केला आहे. रेल्वे प्रकल्प मंजूर करणे हा निष्काळजीपणा आहे का? असा सवाल उपस्थित करत, म्हात्रे काहीही बरळत राहतात; त्यांना रेल्वे मंजुरी प्रक्रियेची माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.
मागील आठवड्यात खासदार सुरेश म्हात्रे यांनी मुरबाड येथे पत्रकार परिषद घेऊन मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडल्याबाबत कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. या आरोपाला उत्तर देण्यासाठी कपिल पाटील यांनी मुरबाड येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी खासदार म्हात्रे यांच्यावर खरपूस टीका केली. म्हात्रे यांचे वक्तव्य गंभीरपणे घेण्यासारखे नाही. समज कमी असल्याने ते असे बोलतात. मी रेल्वे प्रकल्प मंजूर केला; त्या प्रक्रियेत त्यांनी काही योगदान दिले का, हेच विचारावे लागेल. दीड वर्षात तुम्ही काय केले? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मी मोदीजींच्या मंत्रिमंडळात काम केले. त्या काळात केंद्रीय मंत्री मला ओळखत नव्हते का? रेल्वेमंत्र्यांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत. म्हात्रे माझ्या बुद्धीवर प्रश्न करतात; पण त्यांना रेल्वे प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रियाच माहीत नाही, असे कपिल पाटील म्हणाले. मी रेल्वे प्रकल्पाच्या तांत्रिक प्रक्रियेवर फारसे बोलत नाही, कारण म्हात्रे यांना त्यातील एकही टप्पा समजणार नाही,” असे त्यांनी टोलेबाजीच्या सुरात सांगितले.
प्रकल्प मीच मंजूर केले!
राज्याची कामे खासदारांची जबाबदारी नसते, तरीही मी स्वतः कोट्यवधींची कामे केली आहेत. कल्याण-मुरबाड रस्ता, शहापूर-मुरबाड रस्ता आणि मुरबाड रेल्वे हे सर्व प्रकल्प मीच मंजूर केले आहेत, असे सांगत त्यांनी कार्याचा आढावा घेतला.
आगामी निवडणुकीची चाहूल
पत्रकार परिषदेत पाटील यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, आनंदाचा शिधा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या विषयांवरही भूमिका मांडली. भाजप पक्षातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारी प्रक्रियेबाबत विचारणा होताच त्यांनी स्पष्ट केले की, भाजप पक्षात तिकीट वाटपाची स्वतंत्र प्रक्रिया आहे. पक्ष निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत कपिल पाटील कोणत्या इच्छुकांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

