रिक्षाचालकाकडून दागिन्यांची बॅग लंपास
रिक्षाचालकाकडून दागिन्यांची बॅग लंपास
कल्याण गुन्हे शाखेची २४ तासांत यशस्वी कारवाई
कल्याण, ता. ८ (बातमीदार) : प्रवासी महिलेचे सोन्याचे दागिने असलेली बॅग घेऊन पसार झालेल्या रिक्षाचालकास कल्याण गुन्हे शाखा पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. या तत्पर कारवाईमुळे पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालिका गवस (वय ५६) या आपल्या मुलींना भेटण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत आल्या होत्या. महिला डोंबिवली येथून कल्याण पूर्वेत राहणाऱ्या दुसऱ्या मुलीकडे जाण्यासाठी रिक्षाने निघाल्या. त्यांनी प्रवासादरम्यान आपले सोन्याचे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र बॅगेत ठेवले होते. परंतु पिसवली येथे उतरताना महिला आपली बॅग रिक्षातच विसरली. या वेळी रिक्षाचालकाने त्यांच्या दोन बॅगांसह रिक्षा पुढे नेली. काही वेळाने बॅग रिक्षात राहिल्याचे लक्षात येताच या घटनेची माहिती त्यांनी आपल्या जावयाला दिली.
पोलिस स्थानकात तक्रार दाखल होताच गुन्हे शाखा घटक ३, कल्याणचे अधिकारी आणि अंमलदारांनी या घटनेचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने रिक्षा शोधण्यात आली. पोलिसांनी रिक्षा व चालकाचा शोध घेत जयेश गौतम (वय ३२) यास अटक केली. या महिलेने तपासादरम्यान आरोपी आणि आपले सोन्याचे मंगळसूत्र ओळखले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकूण ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन बॅगा असा सुमारे पाच लाख २१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत आरोपी अटक केल्याने ही चोरीची घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

