बळीराजाच्या बांधावर गरवी तूर
वाणगाव, ता. ८ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात कृषी विभागामार्फत बांधावर तूर ही योजना कार्यरत असल्याने तुरीच्या क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसत आहे. निसर्गाच्या बदललेल्या चक्रामुळे पारंपरिक पिके धोक्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे शाश्वत उत्पादनासाठी बांधावर तूर लागवड ही योजना प्रभावी ठरत आहे. तूरडाळीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्याकारणाने घरच्या उदरनिर्वाहासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे.
नुकसानीची कमतरता कमी व्हावी आणि अतिरिक्त उत्पादन आणि उत्पन्न मिळावे, या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीची योजना कार्यरत असून त्याचा फायदा झाल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. मागील काही वर्षांपासून पावसाने भातपिकाचे नुकसान होते; मात्र बांधावर तूर लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी भाताबरोबर तूर बियाण्यांचे वाटप कृषी विभागामार्फत झाले आहे.
जूनमध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत प्रती कुटुंब २५० ग्रॅम तूर बियाणे शेतकऱ्यांना घरपोच देण्यात आले. तूर लागवडीची शास्त्रीय माहिती, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे भातपिकाचे नुकसान झाले तरी बांधावरील तूर उत्पादनातून शेतकरी वर्षभर खाण्यापुरती डाळ उपलब्ध होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
घरचा भात, घरचीच डाळ!
एक एकरावर सुमारे ६० तुरीची रोपे लावली व प्रति रोप २०० ग्रॅम तुरीचे उत्पादन आले तरी सुमारे १२ किलो तूरडाळ घरच्या वापरासाठी मिळू शकते. प्रतिमहिना एक किलोप्रमाणे शेतकऱ्याचे वर्षाच्या तूरडाळीचा बंदोबस्त होऊ शकतो. यामुळे घरचा भात व घरचीच डाळ अशी व्यवस्था शेतकरी करू शकतो, अशी माहिती डहाणू कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सचिन तोरवे यांनी दिली.
मोखाड्यात सर्वाधिक बियाणेवाटप
मोखाडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५०० किलो तूर बियाणे वाटप करून सुमारे दोन हजार एकर बांधावर तुरीची लागवड करण्यात आली. त्या खालोखाल वाडा तालुक्यात ४४६ किलो, डहाणूमध्ये ४२६ किलो, पालघरमध्ये ४०६ किलो बियाणे वाटप करण्यात आले.
निसर्गाच्या बदलत्या ऋतुमानानुसार भातशेतीचे शाश्वत उत्पन्न साध्य होत नसल्याने शेतकऱ्यांना तुरीचा आधार मिळावा, या उद्देशाने बांधावर तुरीची लागवड करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांधावर तुरीची लागवड फायदेशीर ठरत आहे.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर
यावर्षी कृषी विभागामार्फत बांधावर तूर लागवड करण्यासाठी बियाणे उपलब्ध झाले. भात लावणीबरोबर बांधावर तूर लागवड केली असून पिकाची वाढ चांगली झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही उदरनिर्वाहासाठी अपेक्षित तूरडाळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- रेखा जयवंत डोंगरकर, तूर उत्पादक शेतकरी, डहाणू
तालुका तूर बियाणे वाटप (किलो) एकूण लाभार्थी लागवडीखालील क्षेत्र (एकर)
पालघर ४०६ १,४२५ १,६२४
वसई २२६ ७७५ ९०४
डहाणू ४२६ १,४५० १,७०४
तलासरी २०६ ७५० ८२४
वाडा ४४६ १,२२५ १,७८४
विक्रमगड ३८६ १,४२० १,५४४
जव्हार ३०४ १,१२५ १,२१६
मोखाडा ५०० १,२०० २,०००
एकूण २,९०० ९,३७० ११,६००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

