स्वावलंबनाचा फुलला मळा
प्रसाद जोशी, वसई
महिला सक्षमीकरणाबद्दल अनेकदा बोलले जाते; मात्र प्रत्यक्षात त्यांना मदत करता यावी, यासाठी शिक्षण, व्यवसाय आणि उद्योगातून पर्यावरणपूरक आर्थिक दिशा असावी, अशी सांगड घालून राष्ट्रीय जनविकास संस्था अनेक योजना राबवत आहे. त्यांनी समाजातील महिलांना सन्मानाने जगण्यासाठी आधार दिला आहे. त्यामुळे आज शेकडो महिला या स्वावलंबी होऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करू लागल्या आहेत. नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी लागणाऱ्या वस्तू नजरेसमोर ठेवून रोजगाराची संधी त्यांना प्राप्त झाली आहे.
वसईतील वालीव येथील राष्ट्रीय जनविकास संस्था अनेक सामाजिक योजना राबवत महिलांना समाजात आत्मसन्मानाने जगण्यासाठी आधार देत आहे. अक्षय शक्ती वेल्फेअर असोसिएशन, लायन्स इंटरनॅशनल स्कील डेव्हलपमेंट या संस्था महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावत आहेत, हे विशेष म्हणावे लागेल. महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या माजी महापौर प्रवीणा ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर यांनी नुकतीच संस्थेला भेट देत महिलांचे कौतुक करत प्रोत्साहन दिले.
वसई पूर्वेकडील भागात आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेली अनेक कुटुंबे आहेत. शिक्षणाची कमतरता असली, तरी कलेत हातखंडा निर्माण व्हावा, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यापासून ते त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी संस्थेमार्फत काम केले जाते. आजतागायत सुमारे ५०० महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत, ज्यात टेलरिंगसाठी त्यांना मशीन, कापडापासून पिशव्या तयार करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. तसेच प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, त्याऐवजी कापडाचा वापरा, असा पर्यावरणपूरक संदेश घराघरात पोहोचत आहे. त्यामुळे केवळ रोजगार नव्हे, तर सामाजिक स्वास्थ्याचीही काळजी या संस्थेचे संस्थापक शशिकांत ठाकूर यांच्या पत्नी, अर्चना म्हात्रे व त्यांचे सदस्य घेत आहेत. समृद्धी महिला बचत गटाच्या किरण बडे याही महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
संसाराचा गाडा हाकताना, आर्थिक चणचण दूर करता यावी, यासाठी महिला काबाडकष्ट करून प्रशिक्षण घेत आहेत. व्यवसायात उंच भरारी घेऊन उद्योग क्षेत्राकडे जात आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याला सामाजिक संस्थेची जोड त्यांच्या पंखाला बळ देत आहेत.
सामाजिक संस्थांची मदत
वालीव येथे विविध प्रकारचे व्यवसाय करण्याची संधी महिलांना मिळत आहे. हे पाहून लायन्स क्लबने दोन दिवसांपूर्वी आठ विद्युत उपकरणे व कापड उपलब्ध करून दिले आहे. तसेच भविष्यात महिलांसाठी फूड व्हॅन व अन्य व्यवसायांचा उद्देश ठेवला आहे. त्यामुळे आम्ही उद्योजिका असे अभिमानाने त्या समाजाला सांगू शकतील.
डिजिटलमुळे सातासमुद्रापार भरारी
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या महिलांचा व्यवसाय पुढे नेता यावा, म्हणून डिजिटल प्रणालीचा वापर भविष्यात केला जाणार आहे. त्यामुळे वसईच्या उद्योजिका सातासमुद्रापार आपला व्यवसाय करण्यास सक्षम होणार आहेत.
नाशिक, पालघरमधून भाजी आणून १९९० मध्ये विक्री केंद्र सुरू केले. त्यामुळे महिलांना रोजगाराचे साधन प्राप्त झाले. त्यानंतर महापालिकेत महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या, ज्यात तलाव व उद्यानांच्या देखरेखीसाठी महिला पुढे आल्या. सामाजिक संस्था उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे सक्षमीकरणाचा पाया वसई-विरार शहरात मजबूत होऊ लागला आहे.
- प्रवीणा ठाकूर, माजी महापौर
पर्यावरणपूरक व्यवसायासह महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी संकल्पना राबवली जात आहे. शेकडो महिलांना स्वयंरोजगार मिळत आहे. राष्ट्रीय जनविकास संस्थेला वैद्यकीय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण क्षेत्रात आणखी विस्तार होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- उषा ठाकूर, राष्ट्रीय जनविकास संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

