रुग्णसेवेच्या गरजा समजून सोडविण्याचा प्रयत्न करणार

रुग्णसेवेच्या गरजा समजून सोडविण्याचा प्रयत्न करणार

Published on

रुग्णसेवेच्या गरजा समजून सोडविण्याचा प्रयत्न करणार
नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम
राहुल क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे महापालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमी विविध कारणांनी टीकेचे धनी होत असते. या रुग्णालयात ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, शहापूर आणि मुरबाड येथील रुग्णदेखील उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णालयावर अतिरिक्त ताण वाढत असून, रुग्णसंख्येच्या तुलनेत येथील बेड्सची संख्या कमी पडत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांना इतर रुग्णालयांत पाठविण्यात येत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाकडून सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे पालिका प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. याची दाखल घेत पालिका प्रशासनाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांची तडकाफडकी बदली करीत त्या ठिकाणी डॉ. स्वप्नाली कदम यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्याशी संवाद साधला असता रुग्णसेवेतील आवश्यक गरजा समजून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याची माहिती नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
ठाणे पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सध्याच्या घडीला ५०० बेड्स आहेत. तर कोरस रुग्णालयासह सहा प्रसूतिगृह आणि साधारणत: ३५ ते ३६ आरोग्य केंद्रे आहेत. या रुग्णालयांच्या माध्यामातून ठाणेकरांना आरोग्यसेवा पुरविण्यात येत आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनावर होणाऱ्या आरोपानंतर नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील विविध विभागांचा आढावा घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित डॉक्टर्स व परिचारिकांना त्यांच्या विभागात काय समस्या आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत याची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती कदम यांनी दिली. ज्या प्रसूतिगृह विभागावर सर्वात जास्त ताण निर्माण होत आहे त्या विभागातील डाटा विश्लेषण करण्यात येणार असून, त्यातून नेमके कारण शोधून ती समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
त्यामुळे पालिका क्षेत्रातील सहा प्रसूतिगृहांत येणाऱ्या गरोदर मतांची संख्येचा अभ्यास करून काय उपाययोजना करता येईल, यावरदेखील तोडगा काढण्यात येणार असल्याचे डॉ. स्वप्नाली कदम यांनी सांगितले. कोणताही निर्णय दोन्ही बाजूंचा विचार करून घेण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. रुग्णसेवेतील आवश्यक गरजा समजून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
कळवा रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयात ५०० बेड्सची क्षमता असली तरी त्याहून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. असे असले तरी त्यांचे मानसिक संतुलन बिघडू नये, त्यांची चिडचिड होऊ नये, त्यातून रुग्ण अथवा रुग्णांच्या नातेवाइकांशी संवद साधताना सौम्यता असावी, यासाठी त्यांना टप्प्याटप्प्याने कम्युनिकेशनचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेदेखील डॉ. स्वप्नाली कदम यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?
कळवा येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे शहर आणि आसपासच्या शहरांसह ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयातील प्रसूतिगृहात क्षमतेपेक्षा जास्त महिलांना ठेवण्यात आले असून, यामुळे आरोग्य विभागातून प्रसूतीसाठी पाठविण्यात येणाऱ्या महिलांना कळवा रुग्णालय प्रशासन मुंबई आणि जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत होते. आरोग्य केंद्र आणि रुग्णालय प्रशासनाचा समन्वय नसल्यामुळे महिलांचे हाल होत असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर प्रशासनावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. दुसरीकडे रुग्णालयातील वॉर्डसह अतिदक्षता विभाग आणि शस्त्रक्रिया विभागांचे नूतनीकरणाच्या कामादरम्यान ऑक्सिजन पाइपलाइन बसविण्याच्या कामात हलगर्जी केल्याचे प्रकरण समोर आले. वॉर्डमध्ये ऑक्सिजन वाहिनी बसविण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असला तरी त्याची निविदाच अद्याप काढलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com