डोंबिवलीत भाजपचा मास्टरस्ट्रोक
दीपेश म्हात्रे आज करणार भाजपात प्रवेश

डोंबिवलीत भाजपचा मास्टरस्ट्रोक दीपेश म्हात्रे आज करणार भाजपात प्रवेश

Published on

दीपेश म्हात्रे यांचा आज भाजपात प्रवेश
महापौर पद व आमदारकीचे आश्वासन, डोंबिवलीत ठाकरे सेनेला मोठा धक्का

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डोंबिवलीत मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे रविवारी (ता. ९) भारतीय जनाता पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाजपा नेतृत्वाशी त्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. त्यांना महापौर पद व आमदारकीचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत डोंबिवली जिमखाना येथे सकाळी ११ वाजता हा प्रवेश होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीच्या राजकारणात नव्या समीकरणांचा खेळ रंगणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर म्हात्रे यांनी शिंदे सेनेची वाट निवडली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने, त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. डोंबिवली विधानसभा मतदार संघात भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्याचवेळी खिचडी शिजल्याची चर्चा पडद्याआड सुरू होती. मात्र ठाकरे गटातून जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहणारे दीपेश यांनी विरोधी पक्षाची भूमिका घेत, सरकार विरोधात विविध आंदोलन केली. गणेशोत्सवात भाजपा प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांनी म्हात्रे यांच्या घरच्या गणेशाचे दर्शन घेतले होते. त्याचवेळी त्यांच्यात दिलजमाई झाली. तेव्हा म्हात्रे यांना ठोस आश्वासन मिळाल्याचे बोलले जात होते. तेव्हापासून म्हात्रे हे भाजपा मध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र स्वतः म्हात्रे प्रत्येक वेळीस या वृत्ताचा इन्कार करत होते. आपण ठाकरे सेनेतच राहणार असून विभाग बैठका घेत आहोत असे सांगत होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विचारणा केली, असता पक्षांतर्गाबाबत आपला कोणताही विचार नाही असे त्यांनी सांगितले होते.
---
नेतृत्वाशी वाटाघाटी
हे सर्व घडत असतांना भाजपा नेतृत्वाशी वाटाघाटी सुरू होत्या. यापुर्वी बुधवारी (ता.५) पक्षप्रवेशाचा मुहूर्त हुकला. अखेरीस महापौर व आमदारकी या दुहेरी आश्वासनावर भाजपा प्रवेशाचा निर्णय झाला. शुक्रवारी रात्री डोंबिवलीतील कार्यकर्त्यांची एक बैठक त्यांच्या बंगल्यावर झाली. यात डोंबिवली पश्चिमेतील बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पूर्वेतील दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.
-----
चोकट

शिवसेनेतून शिंदे सेनेत, शिंदे सेनेतून पुन्हा ठाकरे सेनेत असा प्रवास करणाऱ्या दीपेश म्हात्रे यांना ठाकरे सेनेने जिल्हाप्रमुखपद बहाल केले. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व जिल्हाप्रमुखांपेक्षा विरोधी पक्ष म्हणून चांगली कामगिरी केली.
--
राजकारणातील महत्वाकांक्षेमुळे त्यांचा पुन्हा भाजपा किंवा शिंदे सेनेत प्रवेश अटळ होता. कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौरपद व डोंबिवलीतील आमदारकी त्यांना खुणावत होती. त्यातूनच भाजपा प्रवेशाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
--
भाजप प्रदेशाध्यक्ष व मंत्री रवींद्र चव्हाण यांचा कल्याण-डोंबिवलीतील राजकारणावर पूर्ण ताबा आहे. परंतु ठाकरे गटात दीपेश म्हात्रे हे एकमेव प्रभावी स्थानिक नेता होते. त्यामुळे विरोधी बाजूची धार कमी करण्यासाठी हा प्रवेश उपयोगी ठरण्याची ही भूमिका राजकीय तज्ज्ञ मांडत आहेत.
.....
पदाधिकारी देखील सोडणार साथ...
दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या शिवसेनेत आल्यानंतर निष्ठावंतांना डावलून त्यांना जिल्हाप्रमूख पद देण्यात आले. त्यामळे जुने शिवसैनिक नाराज होते. म्हात्रे यांनी आपल्या मर्जीतील लोकांना पदे वाटल्याचा आरोप देखील करण्यात येत होता. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपर्कप्रमुख व अन्य महत्वाची पदे आयात नेत्यांना देण्यापेक्षा परिसरातीलच वर्षानुवर्षे एकनिष्ठ असलेल्यांना दिली पाहिजेत. आयारामांमूळे संपूर्ण जिल्ह्यात संघटनेची अपेक्षित बांधणी झालीच नाही. अशी, व्यथा ठाकरेंच्या सेनेतील शिवसैनिक व्यक्त करत आहेत.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com