गटाराचे घाण दुर्गंधी युक्त पाणी नागरिकांच्या दारी
गटाराचे घाण पाणी नागरिकांच्या दारी
मालाड, ता. ९ (बातमीदार) : मालवणी परिसरात गटाराच्या घाण पाण्याचा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून कायम आहे. नवीन कलेक्टर कंपाउंड, गेट क्रमांक ७, प्लॉट क्रमांक ३३, हाथी गार्डनसमोरील घरांच्या दारात हे पाणी साचले असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
गटाराचे पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले आहे, तसेच नागरिकांना या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. रहिवाशांनी वारंवार पालिकेकडे (पी उत्तर विभाग) तक्रारी करूनही केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, पालिका प्रशासनाने तातडीने गटाराची स्वच्छता करून गाळ काढावा, पाण्याचा निचरा करावा, तसेच औषध व धूर फवारणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी सलीम कुरेशी यांनी केली आहे.

