जिल्हा रुग्णालयाच्या कामाला वेग येणार

जिल्हा रुग्णालयाच्या कामाला वेग येणार

Published on

पालघर, ता. ९ (बातमीदार) : जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार राजेंद्र गावित प्रत्यक्ष उपस्थित, तर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हा रुग्णालय बांधकामांच्या प्रगतीचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत घेतला. पालघर जिल्हा रुग्णालयाचे काम निधी नसल्याने काम थांबले आहे. निधीची उपलब्धता करून घ्यावी, यासाठी गावित यांनी आरोग्यमंत्र्यांना विनंती केली. जिल्हा रुग्णालयाचे काम अत्यंत वेगाने, युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या. सफाळे ग्रामीण रुग्णालयासाठी जागेची उपलब्धता व निधी मंजूर झाला असून, बांधकामाच्या निविदा काढून काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. डहाणू महिला रुग्णालयाबाबतीतही निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी आदेश दिले.

पालघर, जव्हार व डहाणूसह जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांनी आदिवासी क्षेत्रात उत्तम आरोग्य सेवा दिल्या पाहिजेत, असे निर्देश दिले. तसेच कुपोषणाच्या स्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या निर्णयांमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि जनसामान्यांना सुलभ होईल, असा विश्वास आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला.

Marathi News Esakal
www.esakal.com