आरक्षण बदलामुळे इच्छुकांचा हिरमोड

आरक्षण बदलामुळे इच्छुकांचा हिरमोड

Published on

टोकावडे, ता. ९ (बातमीदार) : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. अनेक इच्छुक उमेदवारांनी गावोगावी दौरे, सामाजिक कार्यक्रम, सत्कार समारंभ आणि जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या होत्या, मात्र अचानक जाहीर झालेल्या आरक्षणाच्या यादीनंतर काही गटांमध्ये अनपेक्षित बदल झाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पुढे ढकलल्याची शक्यता वाढल्याने उत्साहावर पूर्णपणे पाणी फिरले आहे.

ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ पैकी महिलांसाठी २७ जागा आरक्षित करण्यात आले आहे, तर शहापूर पंचायत समितीच्या ३० पैकी महिलांसाठी १५ जागा आरक्षित, मुरबाड पंचायत समितीच्या एकूण १६ जागांपैकी महिलांसाठी आठ जागा आरक्षित, कल्याण पंचायत समितीच्या एकूण १० पैकी महिलांसाठी पाच जागा आरक्षित, भिवंडी पंचायत समितीच्या एकूण ४२ पैकी महिलांसाठी २१ जागा आरक्षित, तर अंबरनाथ पंचायत समितीच्या एकूण आठ पैकी महिलांसाठी चार जागा आरक्षित आहेत.

अनेक इच्छुकांनी काही महिन्यांपासून तयारी केली होती. कुठे कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी, तर कुठे मतदारसंघात नियमित उपस्थिती ठेवून जनसंपर्क वाढवण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र नव्याने जाहीर झालेल्या आरक्षण यादीनुसार काही गट स्त्री व मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव पडल्याने काही इच्छुक उमेदवारांचे राजकीय समीकरण पूर्णपणे कोलमडले आहे.

काही ठिकाणी दशकभरापासून राजकीय जम बसवणारे, स्थानिक पातळीवर मजबूत संपर्क ठेवणारे इच्छुक या बदलामुळे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण असून, ‘गट आरक्षित पडल्याने वर्षानुवर्षांची तयारी वाया गेली’, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटते आहे. त्यातच जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

नगर पंचायत आणि नगरपालिका निवडणुका आल्याने पक्षांचे लक्ष सध्या शहरी भागाकडे वळले आहे. त्यामुळे ग्रामीण इच्छुकांना दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना वाढली आहे. परिणामी जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांचा उत्साह ओसरला असून, राजकीय हालचाली काही काळासाठी थंडावल्या आहेत, मात्र राजकीय जाणकारांचे मत आहे की, ही शांतता तात्पुरतीच आहे. पुढील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की, पुन्हा एकदा ग्रामीण भागात राजकीय तापमान वाढेल आणि आत्ता नाराज असलेले अनेक इच्छुक पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज होतील. आरक्षण बदल आणि निवडणूक पुढे ढकलल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इच्छुकांचा उत्साह मंदावला असला, तरी काही दिवसांत राजकारणाचे तापमान पुन्हा तापणार आहे

आर्थिक गुंतवणूक थंडावली!
अनेक इच्छुकांनी प्रचारासाठी केलेली आर्थिक व सामाजिक गुंतवणूक आता थंडावली आहे. जनसंपर्क थांबले असून, आयोजित कार्यक्रम, सत्कार, जेवणावळी यांनाही विराम लागला आहे. काहींनी आपले गट बदलण्याची तयारी सुरू केली असली तरी पक्षीय समीकरणांमुळे हेही सहज शक्य होत नाही.

Marathi News Esakal
www.esakal.com