

मनसे पदाधिकाऱ्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला
उल्हासनगरात मद्यधुंद टोळीचा कहर
उल्हासनगर, ता. ९ (बातमीदार) : उल्हासनगरात शुक्रवारी (ता. ७) मध्यरात्री रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. मनसेच्या उपविभाग अध्यक्षावर अज्ञात टोळीने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहर हादरले आहे. कॅम्प ४ मधील सीएनजी पंपाजवळ घडलेल्या या घटनेने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गंभीर जखमी झालेल्या अजय बागुल यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद चालू होता. परिस्थिती चिघळू नये, यासाठी अजय बागुल यांनी त्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी ऐकण्याऐवजी उलट अजय बागुल यांच्यावरच हल्ला चढवला. लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, हल्लेखोरांच्या ओळखीचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. मध्यरात्रीनंतर उघडे असलेल्या आणि गर्दी वाढवणाऱ्या चायनीज दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने पोलिसांकडे केली आहे. वारंवार तक्रारी असूनही पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला.
राजकीय व्यक्तीवर झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून अजय बागुल यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.